भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एका विक्रमाची बरोबरी केली आहे.
मोहम्मद सिराजने या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने या कसोटीत तब्बल आठ बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. यासोबतच त्याने लॉर्ड्सवर ३९ वर्षापूर्वी झालेल्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.
कुठल्याही भारतीय गोलंदाजने लॉर्ड्सवर आठ किंवा आठ पेक्षा जास्त बळी घेण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली आहे. याआधी कपिल देव यांनी ही कामगिरी केली होती. १९८२ साली इंग्लड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली होती. आता तब्बल ३९ वर्षांनंतर सिराजने कपिलदेव यांच्या लॉर्ड्सवर केलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पहिल्या कसोटीतही सिराजने दमदार कामगिरी केली होती. आपल्या गोलंदाजीने त्याने इंग्लिश खेळाडूंच्या नाकी नऊ आणले होते. पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात दोन असे एकूण पाच बळी घेत सामन्यात मोलाची भूमिका बजावली होती. लॉर्ड्स कसोटीत त्याने ५२ व्या षटकात जोस बटलर आणि जेम्स अँडरसनच्या विकेट्स घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
लॉर्ड्स कसोटीत भारताने इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ १२० धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात अफगाणिस्तानचे खेळाडू सहभागी होणार का? ‘ही’ माहिती आली समोर
कर्णधारानेच टिपला कर्णधाराचा झेल; कोहलीचा आनंद गगनात मावेना, पाहा व्हिडिओ