आशिया चषक २०२२ चा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. २७ ऑगस्ट्पासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषकातील सामने खेळले जाणार आहेत. तर पाकिस्तानचा संघ २८ ऑगस्ट्पासून भारताविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आशिया चषत मोहिमेची सुरुवात करेल. तत्पूर्वी पाकिस्तान संघासाठी वाईट बातमी पुढे आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम जुनिअर याला दुखापत झाली असून तो यामुळे गुरुवारचे (२५ ऑगस्ट) सराव सत्रही पूर्ण करू शकला नाही. यानंतर पाकिस्तान संघाची डोकेदुखी वाढली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) अगोदरच गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) अनुपलब्ध असेल. आता त्याच्यानंतर २१ वर्षीय वसीम (Mohammad Wasim) दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यास पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी फळी कमजोर पडेल.
आशिया चषकाची सुरुवात होण्यापूर्वी गुरुवारी पाकिस्तानचे खेळाडू दुबईतील आयसीसी अकादमीत सराव करत होते. या सराव सत्रादरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे वसीमला अर्ध्यातूनच एमआरआयसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु अद्याप वसीमची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
वसीमची दुखापत पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. अनुभवी वेगवान गोलंदाज आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तान बोर्डाचे आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनची निवड केली आहे. तसेच वेगवान गोलंदाजी विभागात हॅरिसा राउफ, शाहनवाज दहानी आणि नसीम शाह वेगवान गोलंदाजी विभागात आहेत. अशात वसीममुळे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीला आधार मिळाला असता.
वसीमने गतवर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने ११ टी२० सामने खेळताना १५.८८ च्या सरासरीने आणि ८.१० च्या इकोनॉमीने १७ विकेट्स चटकावल्या आहेत. त्याने मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत प्रभावशाली प्रदर्शन केले होते. या मालिकेतील ३ वनडे सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या.