ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेऊनही दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्याने ऑस्ट्रेलियन संघाने ८ गडी राखून सहज विजय मिळविला. भारतीय संघाची कसोटी सामन्यांतील ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. या लज्जास्पद कामगिरीमुळे भारतीय संघावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.
मात्र या कसोटी मालिकेतील ३ सामने अजूनही शिल्लक आहेत. भारतीय संघाला पुनरागमन करायचे असल्यास हा पराभव लवकरात लवकर विसरणे गरजेचे असेल. तसेच सकारात्मक दृष्टीकोनाने पुढील सामन्यांकडे बघावे लागेल. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने देखील काहीसा असाच सल्ला भारतीय संघाला दिला आहे.
संघाने एकजूट व्हावे
मोहम्मद कैफने ट्विट करताना लिहिले, “आपले फोन बंद करा. बाहेरचा कोलाहल ऐकणे थांबवा. संघ म्हणून एकजूट व्हा आणि मागचे विसरून पुढील सामन्यांकडे लक्ष केंद्रित करा. मागच्या पराभवातून सावरण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अजिंक्य रहाणेने संघाला एकत्र आणून आपले नेतृत्व सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे.”
Switch off the phones, shut out the noise, stick together as a group and look ahead, that is the only way to get out of this right now for India. @ajinkyarahane88 needs to gather the group together and stamp his leadership going forward #hanginthere #AusvInd #cricket
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 19, 2020
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांच्या अडचणीत अजूनही भरच पडते आहे. विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतत आहे, तसेच मोहम्मद शमी दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकणार आहे. अशा परिस्थतीत अनेक आजी-माजी खेळाडूंनी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया क्लीन-स्वीप देईल, असे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे ही मानहानी टाळून भारताला पुनरागमन करायचे असल्यास कैफचा सल्ला त्यांच्यासाठी निश्चितच मोलाचा ठरेल.
संबधित बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
– बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ही रणनीती वापरा; गौतम गंभीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला
– मोहम्मद कैफचे पृथ्वी शॉच्या फलंदाजीला समर्थन; ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी दिला होता हा सल्ला