साउथँम्पटन। आयसीसी 2019 विश्वचषकात शनिवारी(22जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात द रोज बॉल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्रिक घेत महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. तर भारताला 3 विकेट्सची गरज होती. यावेळी या षटकात गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमीच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने चौकार ठोकत इरादे स्पष्ट केले. पण त्याला दुसऱ्या चेंडूवर एकही धाव घेतला आली नाही.
त्यानंतर त्याने शमीने टाकलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतू हार्दिक पंड्याने त्याचा झेल घेतला. त्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. त्याच्या पुढच्याच सलग दोन चेंडूंवर शमीने अनुक्रमे अफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला शुन्य धावेवर त्रिफळाचीत केले आणि त्याची विश्वचषकातील पहिली हॅट्रिक साजरी केली.
त्याचबरोबर शमी हा विश्वचषकात हॅट्रिक घेणारा केवळ दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी 1987 च्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना भारताकडून चेतन शर्मा यांनी पहिल्यांदा हॅट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे ही विश्वचषक इतिहासातील पहिलीच हॅट्रिक होती. त्यानंतर आता 32 वर्षांनंतर भारताकडून शमीने विश्वचषकात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे.
त्याचबरोबर शमी हा विश्वचषकात हॅट्रिक घेणारा एकूण नववा गोलंदाज ठरला आहे. विश्वचषकात आत्तापर्यंत फक्त लसिथ मलिंगाला दोन वेळा हॅट्रिक घेण्यात यश आले आहे. त्याने 2007 आणि 2011 च्या विश्वचषकात हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे. अन्य 8 गोलंदाजांना प्रत्येकी एकदा विश्वचषकात हॅट्रिक घेता आली आहे.
आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतली आहे विश्वचषकात हॅट्रिक –
1987 – चेतन शर्मा (भारत)
1999 – सक्लेन मुश्ताक (पाकिस्तान)
2003 – चामिंडा वास (श्रीलंका)
2003 – ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)
2007 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)
2011 – केमार रोच (विंडीज)
2011 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)
2015 – स्टिव्हन फिन (इंग्लंड)
2015 – जेपी ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका)
2019 – मोहम्मद शमी (भारत)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–स्टम्पिंग किंग एमएस धोनीने रचला इतिहास, केला नवा विश्वविक्रम
–ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड नंतर विश्वचषकात असा पराक्रम करणारा भारत केवळ तिसराच संघ