Mohammed Shami Comeback Update : स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघातून बाहेर आहे. चाहते शमीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता मोहम्मद शमीच्या भारतीय संघातील पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शमी आता मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. शमी शेवटचा वनडे विश्वचषक 2023 मध्ये खेळताना दिसला होता. यानंतर शमीच्या पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती.
मोहम्मद शमी लवकरच पुनरागमन करू शकतो
ईएसपीएनच्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सप्टेंबरमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त होऊन क्रिकेटच्या मैदानात परत येऊ शकतो. बांगलादेशचा संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेतून शमी भारतीय संघात पुनरागमन करू शकेल, अशी आशा निवडकर्त्यांना आहे. मात्र त्याआधी शमीला त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागेल. ज्यासाठी शमी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
शमीच्या पुनरागमनाबाबत संघ निवडकर्ता काय म्हणाले होते?
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणते खेळाडू निवडले जातील याची आम्हालाही कल्पना नाही. सध्या भारतीय संघाचे काही खेळाडू दुखापतग्रस्त असून त्यांच्या बरे होण्याची प्रतीक्षा आहे. मोहम्मद शमीनेही गोलंदाजी सुरू केली आहे. जे संघासाठी चांगले संकेत आहेत. भारताचा पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी बांगलादेशसोबत खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापर्यंत शमी पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही? हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्हाला याबाबत एनसीएलाच (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) विचारावे लागेल.
वनडे विश्वचषकात दिसला होता शमीचा जलवा
मोहम्मद शमीने 2023च्या वनडे विश्वचषकात शानदार प्रदर्शन केले होते. दुखापतग्रस्त असतानाही शमीने वनडे विश्वचषक गाजवला होता. शमी 2023च्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. शमीने या स्पर्धेत 24 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे हा वेगवान गोलंदाज आयपीएल 2024 ही खेळू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया करणार विशेष सराव
विनेशसाठी धावून आला सचिन तेंडूलकर; गणित समजावत म्हणाला, “तिला रौप्य पदक…”
नीरज चोप्राच्या आईनं केलेल्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया भावूक! म्हणाला…