टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीनं आगामी लोकसभा निवडणुकीत शमीला पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात शमीचं भाजपाच्या उच्च नेतृत्वाशी बोलणं झाल्याचंही कळतं. सर्व काही सुरळीत राहिल्यास शमी बसीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. शमी सध्या शस्त्रक्रियेमुळे क्रिकेटपासून दूर आहे.
भारतीय क्रिकेटपटू आणि राजकारणाचं नातं तसं फार जुनं. याआधीही अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी निवडणूक लढवली आहे. काही क्रिकेटपटू तर खासदार किंवा आमदारही झालेत, तर काहींना राजकारणात अपयशाला सामोरे जावं लागले. चला तर मग, आजच्या या लेखात जाणून घेऊया अशा 10 भारतीय क्रिकेटपटूंबद्दल ज्यांनी क्रिकेटनंतर राजकारणात एंट्री घेतली आहे.
1. नवज्योत सिंग सिद्धू – टीम इंडियाचा माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू यानं 2004 साली भाजपासोबत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सिद्धूनं पहिल्याच प्रयत्नात अमृतसर लोकसभा निवडणूक जिंकली. मात्र पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर त्यानं 2016 मध्ये भाजपाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तो सध्या काँग्रेसमध्ये सक्रिय आहे.
नवज्योत सिंग सिद्धूनं भारतासाठी 51 कसोटी आणि 136 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी सामन्यांमध्ये सिद्धूनं 42.13 च्या सरासरीनं 3202 धावा केल्या, ज्यात 9 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सिद्धूनं 37.08 च्या सरासरीनं 4413 धावा केल्या. या काळात त्यानं 6 शतके आणि 33 अर्धशतकं झळकावली.
2. मोहम्मद अझरुद्दीन – टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे परिणाम झाला. अझरुद्दीननं 2009 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तो उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून लोकसभेवर निवडून गेला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत अझरुद्दीनला पराभवाला सामोरं जावं लागलं. अझरुद्दीननं गेल्या वर्षी तेलंगणा विधानसभेसाठी हैदराबादच्या जुबली हिल्स मतदारसंघातून निवडणूक लढवली, ज्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
अझरुद्दीननं भारतासाठी 334 एकदिवसीय सामन्यांमध्ये 36.92 च्या सरासरीनं 9378 धावा केल्या आहेत. अझहरनं वनडेमध्ये 7 शतकं आणि 58 अर्धशतकं झळकावली. त्याच वेळी, कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 45.03 च्या सरासरीनं 6215 धावा केल्या, ज्यात 22 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.
3. गौतम गंभीर – टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं राजकारणात चांगल यश मिळवलं. गौतम गंभीरनं 22 मार्च 2019 रोजी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर गंभीरनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवरून मोठा विजय नोंदवला. गौतम गंभीरनं अरविंदर सिंग लवली यांचा तब्बल 3 लाख ९१ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र गंभीरनं नुकतीच आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसण्याची घोषणा केली. त्याला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं आहे.
गौतम गंभीरनं भारतासाठी 58 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीनं 4154 धावा केल्या ज्यात नऊ शतकांचा समावेश आहे. गंभीरनं 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीनं 5238 धावा केल्या आहेत. यामध्ये 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळलेल्या 97 धावांच्या संस्मरणीय खेळीचाही समावेश आहे. गंभीरनं आंतरराष्ट्रीय टी-20 च्या 37 सामन्यांत सात अर्धशतकांच्या मदतीनं 932 धावा केल्या आहेत.
4. मनोज तिवारी – माजी फलंदाज मनोज तिवारी सध्या पश्चिम बंगाल सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे. 2021 विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यानं तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोज तिवारीनं शिबपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानं भारतासाठी एकूण 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात, मनोज तिवारीनं 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. तिवारीनं एकदिवसीय सामन्यात पाच विकेटही घेतल्या आहेत. त्याच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 धावा आहेत.
5 एस. श्रीशांत – भारताचा माजी वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतनंही राजकीय खेळपट्टीवर आपलं नशीब आजमावलंय. श्रीशांतनं तिरुअनंतपुरममधून 2016 ची केरळ विधानसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
श्रीशांतनं भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. या काळात त्यानं एकूण 169 विकेट घेतल्या. तो 2007 टी-20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विजयी भारतीय संघाचा भाग होता. 2007 च्या T20 विश्वचषक फायनलमध्ये श्रीशांतनं मिस्बाह-उल-हकचा अप्रतिम झेल घेतला होता, जो चाहते कधीही विसरू शकत नाहीत.
आयपीएल 2013 मध्ये कथित स्पॉट फिक्सिंगसाठी एस. श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. 2020 मध्ये BCCI लोकपालनं त्याच्यावरील बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली. यानंतर त्यानं केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.
6. हरभजन सिंग – टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या आम आदमी पक्षाच्या (आप) तिकिटावर राज्यसभेचा खासदार आहे. भज्जीनं डिसेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानं 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. कसोटी सामन्यांमध्यं, हरभजननं 32.46 च्या सरासरीनं 417 बळी घेतले. कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत हरभजन चौथ्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय सामन्यात हरभजन सिंगनं 33.35 च्या सरासरीनं 269 विकेट घेतल्या. तर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भज्जीनं 25.32 च्या सरासरीनं 25 विकेट घेतल्या. तो 2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता.
7. मोहम्मद कैफ – टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफनंही राजकारणात आपलं नशीब आजमावलंय. कैफनं उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून काँग्रेसच्या तिकीटावर 2014 ची लोकसभा निवडणूक लढली होती. मात्र या निवडणुकीत त्याचा भाजपाच्या केशव प्रसाद मौर्य यांनी पराभव केला.
मोहम्मद कैफनं 13 कसोटी सामन्यात 32.84 च्या सरासरीनं 624 धावा केल्या आहेत. 125 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 32.01 च्या सरासरीनं 2753 धावा आहेत. 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना खेळलेल्या भारतीय संघाचाही तो एक भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!
सामन्यादरम्यान मिळाली होती गळा कापण्याची धमकी! जाणून घ्या युवराज सिंगच्या विक्रमी 6 षटकारांची कहानी
IPL 2024 : आयपीएलमधील 5 स्टार भारतीय खेळाडू जे कधीच आपल्या घरच्या संघाकडून खेळले नाहीत