भारतीय क्रिकेट संघ (India Cricket Team) सध्या श्रीलंकेविरुद्धच्या आगामी २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करतो आहे. ४ मार्चपासून मोहाली येथील पहिल्या कसोटी सामन्याने या मालिकेचा शुभारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) यालाही जागा देण्यात आली आहे. या मालिकेपूर्वी शमीने नेट्समध्ये सराव करताना त्याला कोणता फलंदाज सर्वाधिक सतवतो(Batsman Who Frustrate Shami In Nets), याबद्दल उलगडा केला आहे.
शमीला आधुनिक क्रिकेटमधील प्रतिभाशाली वेगवान गोलंदाजांमध्ये गणले जाते. बऱ्याचदा तो क्रिकेटच्या मैदानावर दिग्गज फलंदाजांचाही घाम काढताना दिसतो. परंतु नेट्समध्ये सराव करत असताना भारताचा एक फलंदाज त्याला खूप त्रास देतो. त्याच फलंदाजाचे नाव शमीने ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या ‘आयडिया एक्सचेंज कार्यक्रमा’त बोलताना सांगितले आहे. यावेळी त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीशी संबंधित इतर पैलूंबद्दलही खुलासे केले.
शमी म्हणाला की, “मला भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला नेट्समध्ये गोलंदाजी करायला अजिबात आवडत नाही. बीसीसीआय मला गोलंदाजी करण्याचेच पैसे देते आणि हेच माझे काम आहे. मलाही जगातील कोणत्याही फलंदाजाला गोलंदाजी करण्यात मजा येते. परंतु पुजारासारखे इतर कोणताही फलंदाज तुम्हाला इतका सतवू शकत नाही. सर्वांना माहित आहे की, पुजारा जेव्हापर्यंत १०० ते २०० चेंडू खेळून काढत नाही, तोपर्यंत त्याला झोप येत नाही. याच कारणामुळे नेट्समध्ये सराव करत असताना मला त्याला गोलंदाजी करायला आवडत नाही.”
बुमराहसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्साही केला शेअर
याखेरीज शमीने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासोबत झालेल्या आपल्या पहिल्या भेटीबद्दलचाही किस्सा सांगितला आहे.
तो म्हणाला की, “मी बुमराहला आयपीएलदरम्यान पहिल्यांदा भेटलो होतो. पण त्याच्या गोलंदाजी शैलीला पाहिल्यानंतर मला तो जरा वेगळा व्यक्ती वाटला होता. मी त्याची गोलंदाजी शैली पाहून विचारात पडलो होतो की, कोण इतक्या वेगाने कसे गोलंदाजी करू शकतो. यासाठी त्याला इतकी ताकद कुठून मिळते. पुढे जेव्हा त्याला भारतीय संघाचा जागा मिळाली, त्यानंतर मी त्याला अजून जवळून जाणून घेऊ शकलो. त्याने भारतीय संघाकडून चांगले प्रदर्शन केले आणि तो कसोटी संघाचाही भाग बनला. आज सर्वजण एका वेगळ्या बुमराहला पाहतात. त्याचे त्याच्या गोलंदाजीवर नियंत्रण आहे. त्याच्याजवळ सर्वकाही आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
अगग! टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला करायचा आहे ४ देशांचा दौरा, वेळापत्रक असेल खूप व्यस्त
रॉयची जागा भरण्यासाठी गुजरातकडे ‘या’ तीन वादळी फलंदाजांचे पर्याय; सामन्याला कलाटणी देण्यात माहिर
रोहित आणि विराटचा मोहालीत कॅप्टन्सीचा कहर योगायोग, दोघांनीही येथूनच सुरू केलाय नवा प्रवास