भारतीय क्रिकेट संघात सध्या जागा मिळवण्यासाठी किंवा जागा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर स्पर्धा पाहायला मिळत आहे. अशात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला आता आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी संघात निवडले जाणार नसल्याचे समजत आहे.
जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजांचे टी२० संघातील स्थान निश्चित आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून दिपक चाहर, हर्षल पटले किंवा अर्शदीप सिंग यांपैकी एकाला पसंती दिली जाणार असल्याने शमीच्या टी२० कारकिर्दीवर नेहमीसाठी ब्रेक लागू शकतो. स्वत: निवड समितीच्या एका सदस्याने (Indian Team Selectors) याबद्दल माहिती दिली आहे.
भारतीय संघाच्या निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, “शमीचे (Mohammad Shami) वय दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत आहे. आम्हाला त्याला कसोटी क्रिकेटसाठी नव्याने तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे टी२० क्रिकेटसाठी त्याचा नावाचा विचार केला जाणार नाही. आम्ही टी२० विश्वचषकानंतर वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल त्याच्याशी बोललो आहोत. सध्या टी२० क्रिकेटसाठी तो भारतीय संघाच्या योजनेचा भाग नाही. सध्या आमचे प्राधान्य युवा गोलंदाजांवर आहे.”
मोहम्मद शमीसाठी टी२० विश्वचषक २०२१ ठरला अखेरचा
३१ वर्षीय शमी गेल्या काही महिन्यांमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघातील प्रमुख सदस्य होता. मात्र नोव्हेंबर २०२१ मध्ये टी२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळल्यानंतर त्याला अद्याप टी२० संघात पुनरागमन करता आलेले नाही. आता भविष्यातही त्याला टी२० संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. शमीने आतापर्यंत भारतासाठी १७ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९.५५ च्या इकोनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या आहेत.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक २०२२ खेळायचा आहे. अशात आता या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी शमीच्या जागी कोणता वेगवान गोलंदाज टी२० संघात जागा मिळवण्यात यशस्वी ठरतो, हे पाहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं तर! कॉमनवेल्थच्या सेमी फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाशी भिडणार भारत, जाणून घ्या तारिख आणि वेळ
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद






