भावनी माता मैदान दादर (पूर्व) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्यादिवशी बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. पुरुष व महिला विभागातील ४-४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. पुरुष विभागात देना बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एयर इंडिया आणि रायगड पोलीस तर महिला विभागात संघर्ष, महात्मा गांधी, शिवशक्ती आणि अनिकेत स्पो यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष विभागात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामना एयर इंडिया विरुद्ध जे.जे. हॉस्पिटल यांच्यात झाला. एयर इंडिया संघाने सुरुवातिपासून आक्रमक खेळ करत आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यत दोन लोन टाकत एयर इंडिया संघाने २२-०६ अशी भक्कम आघाडी मिळवली होती. एयर इंडिया कडून पंकज मोहिते व सुशांत साहिल यांनी उत्कृष्ट खेळ केला. शुभम शिंदेने चांगला पकडी केल्या. एयर इंडियाने ३२-१० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
देना बँक विरुद्ध बँक ऑफ इंडिया यांच्यात अंत्यत चुरशीची लढत झाली. देना बँकने ३६-३५ असा रोमहर्षक विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मध्यंतरपर्यत २५-१८ अशी आघाडी बँक ऑफ इंडिया कडे होती. शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना देना बँक संघाने लोन टाकत सामन्यात चुरस वाढवली. ३५-३४ असा असताना शेवटच्या क्षणी देना बँक कडून ऋषभ कुलकर्णीने केलेली पकड आणि चढाईत नितीन देशमुखने मिळवले गुण निर्णायक ठरला.
महिंद्रा अँड महिंद्राने युनियन बँकला ४८-३७ असा नमवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तर रायगड पोलीस संघाने सेंट्रल बँकचा ३७-१० असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
महिला गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जास्त चुरस बघायला नाही मिळाली. संघर्ष उपनगर विरुद्ध स्वराज्य उपनगर यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात संघर्ष उपनगरने ४२-१८ असा सहज विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
डॉ. शिरोडकर स्पो. मुंबई विरुद्ध महात्मा गांधी स्पो. उपनगर यांच्यात झालेल्या लढतीत महात्मा गांधी स्पो. संघाने ३२-१७ असा विजय मिळवला. तर शिवशक्ती महिला संघ मुंबई विरुद्ध शिवतेज, ठाणे यांच्यात झालेला सामना शिवशक्ती संघाने ५७-२४ असा सहज जिंकला.
महिलाचा शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगला झाला. अनिकेत स्पो. रत्नागिरी विरुद्ध जागृती प्रतिष्ठान, पुणे यांच्यात झालेला सामना अनिकेत स्पो. रत्नागिरी संघाने ३०-२६ असा विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला.
पुरुष विभाग उपांत्य फेरीचे सामने:
१) एयर इंडिया विरुद्ध रायगड पोलीस
२) महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध देना बँक
महिला विभाग उपांत्य फेरीचे सामने:
१) शिवशक्ती, मुंबई विरुद्ध संघर्ष, उपनगर
२) महात्मा गांधी स्पो, उपनगर विरुद्ध अनिकेत स्पो. रत्नागिरी