पुणे : कोल्हापूर झालेल्या आंतरशालेय राज्य नेमबाजी स्पर्धेत अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मोहसीन शेखने ३७५ गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यामुळे एसजीएफआय (SGFI) यांच्या वतीने हरयाणा घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती, आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक गुलजार शेख यांनी दिली.
१९ वर्षांखाली मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहसीन शेखने हे यश मिळविले. अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर मोहसीनने ३७५ गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर औरंगाबादचा सार्थक नेथवेने ३७५ गुणांसह रौप्य तर कोल्हापूरच्या संकेत पाटीलने ३७२ गुणांसह कांस्य पदक मिळविले.
मोहसीनने मिळविलेल्या यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती परवीन झेड शैख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोहसीनला आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिसा सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.