दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या टी२० विश्वचषकातील साखळी सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडवर ८ गड्यांनी मात करत उपांत्य फेरीत जाण्याच्या आपल्या आशा बळकट केल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत स्कॉटलंडचा डाव अवघ्या ८५ धावांवर गुंडाळला होता. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने या सामन्यात अत्यंत भेदक गोलंदाजी केली. त्याच्या सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाज बाद झाले. मात्र, तरीही शमीची हॅट्रिक पूर्ण होऊ शकली नाही.
भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी
पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मिळून केवळ दोन बळी घेणाऱ्या भारताच्या गोलंदाजांनी यापूर्वी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तसेच स्कॉटलंडविरुद्ध आपल्या नेत्रदीपक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या सामन्यात फिरकीपटू रवींद्र जडेजा व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १५ धावांत तीन बळी मिळवले. तर, जसप्रीत बुमराह याने १० धावांमध्ये दोन जणांना तंबूचा रस्ता दाखवला.
शमीची हुकली हॅट्रिक
स्कॉटलंडच्या डावातील १७ वे षटक टाकताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सलग तीन फलंदाज बाद झाले. मात्र, त्याची हॅट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने मॅक्लॉइड याचा अप्रतिम यॉर्कर चेंडूवर त्रिफळा उडवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजीला आलेल्या साफीयान शरीफ याने चेंडू मिड विकेटच्या दिशेने तटवला व तो धाव घेण्यासाठी धावला. मात्र, नॉन स्ट्राइकवरील फलंदाजाने प्रतिसाद न दिल्याने तो धाव पूर्ण करू शकला नाही. राखीव क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या ईशान किशनने धावत येऊन त्याला धावबाद केले. पुढील चेंडूवर शमीने पुन्हा एकदा धारदार यॉर्कर मारत इवान्सला त्रिफळाचीत केले. अशा रीतीने सलग तीन चेंडूंवर तीन बळी घेऊनही शमीची हॅट्रिक होऊ शकली नाही.
सलामीवीरांची तुफान फटकेबाजी
सर्व गोलंदाजांनी मिळून स्कॉटलंडचा डाव ८५ धावांवर गुंडाळल्यानंतर अफगाणिस्तानपेक्षा सरस रनरेट करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना ७.१ षटकात जिंकणे अनिवार्य होते. सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी तुफान फटकेबाजी करत हे आव्हान ७.३ पूर्ण करून दिले. रोहितने १६ चेंडूत ३० व राहुलने १९ चेंडूत ५० धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तीन बळी घेणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.