महिला आशिया कप 2026 स्पर्धेची (Women’s Asia Cup 2026) सुरुवात 28 ऑगस्टपासून होत असून, यात एकूण 8 संघ सहभागी होत आहेत आणि त्यांना 4-4 च्या दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. यावेळच्या महिला आशिया कपचे यजमानपद यूएई करत असून सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
बीसीसीआयकडून (BCCI) या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली असून, यात टीम इंडियाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करताना दिसणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत बीसीसीआयसमोर जी एक मोठी समस्या किंवा विचित्र स्थिती उभी राहू शकते, ती म्हणजे अंतिम सामन्यात होणारी अवॉर्ड सेरेमनी. जर भारतीय महिला संघ ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो आशियाई क्रिकेट कौन्सिलचे प्रमुख, जे पीसीबी चीफ देखील आहेत, अशा मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारणार की नाही?
भारतीय पुरुष संघाने जेव्हा वर्ष 2025 मध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) नेतृत्वाखाली फायनल सामन्यात पाकिस्तानी टीमचा पराभव केल्यानंतर ट्रॉफी आपल्या नावावर केली होती, तेव्हा त्यांनी अवॉर्ड सेरेमनीमध्ये मोहसिन नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. यानंतर नक्वी ती ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन निघून गेले होते, जी आतापर्यंत भारतीय टीमला मिळालेली नाही. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख असण्यासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. भारतीय महिला संघाला आगामी आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबतच ग्रुप-ए मध्ये ठेवले असून, दोन्ही संघ 5 सप्टेंबर रोजी आमने सामने येतील.
आता सर्वांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आशिया कपचे विजेतेपद पटकावले, तर तो अवॉर्ड सेरेमनीमध्ये मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारेल की नाही?
रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी बीसीसीआयने आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, परंतु बोर्डाचे असे स्पष्ट मत आहे की दोन्ही संघांमध्ये कोणत्याही प्रकारची औपचारिक बातचीत होणार नाही, मात्र ते अवॉर्ड सेरेमनीसाठी ‘प्रतीक्षा करा आणि पहा’ हे धोरण अवलंबेल.
गेल्या वर्षीसारखा वाद टाळण्याचा एक मार्ग असा असू शकतो की, नक्वी यांनी स्वतः ट्रॉफी प्रदान न करता आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला हा सन्मान प्रदान करू द्यावा. पीसीबी चीफ आणि सध्याचे आशियाई क्रिकेट कौन्सिलचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी जेव्हा भारतीय पुरुष टीमला इतर कोणाकडूनही ट्रॉफी देऊ दिली नव्हती आणि ती ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन निघून गेले होते, तेव्हापासून आशिया कपची ट्रॉफी एसीसी ऑफिसमध्ये ठेवली आहे. नक्वी यांनी नंतर म्हटले होते की, भारताने एसीसी कार्यालयात येऊन आमच्याकडून ट्रॉफी घ्यावी. हा तिढा संपवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले होते, ज्यामध्ये आयसीसीच्या बैठकीदरम्यान बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी नक्वी यांची भेट घेतली होती. सैकिया यांनी म्हटले होते की, दोन्ही बाजून्मधील तिढा सुटला आहे, पण त्या वेळीही ट्रॉफीचा मुद्दा सुटू शकला नव्हता.






