ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मोझेस हेंड्रिक्सने त्याला आलेल्या निराश्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्याने एकदा प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊन गेल्याचे सांगितले आहे. २०१७ ला हेंड्रिक्सला नैराश्याने ग्रासले होते. यासाठी त्याला वैद्यकिय मदत घ्यावी लागली होती.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केलेल्या हेंड्रिक्सने ‘ओडिनरोली स्पीकिंग पॉडकास्ट’ला सांगितले की, ‘जर आपण गुगलवर नैराश्येची लक्षणे पाहिली तर त्यातील जवळजवळ सर्व लक्षणांचा सामना मी करत होतो.’
तो म्हणाला, ‘मला आठवत आहे की मी अंथरुणावर पडून राहत असे आणि स्वतःहून वेगवेगळी औषधे घेण्याचा विचार करायचो. मला वाटायचे की मी एखाद्याला फोन करावा’
याबरोबरच त्याने आत्महत्येच्या विचाराबद्दल सांगितले की तास्मानिया विरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान घरी परत येताना त्याच्या कारचा अपघात करण्याचा विचार त्याने केला होता.
तो म्हणाला, ‘मला आठवतंय की मी कारमध्ये होतो आणि ११० किलोमीटर प्रतीतासच्या वेगाने हायवेवर कार चालवत होतो. मी विचार करत होतो की माझ्या कारला अशा प्रकारे वळवावे की जेणेकरुन ती एखाद्या खांबाला किंवा इतर वस्तूला धडकली पाहिजे.’
तसेच हेंड्रिक्स पुढे त्याचा हा विचार बदलल्याचे सांगताना म्हणाला, ‘जर मी असे केले तर काय परिणाम होईल? मी हे करु शकत नव्हतो. ते माझ्या भावांसाठी, माझी पत्नी क्रिस्तासाठी योग्य ठरले नसते. मला पाठिंबा दिलेल्या लोकांसाठी हे योग्य नव्हते. मी माझ्या संघाला पुढील २ दिवसासाठी १० खेळाडूंसह सोडू शकत नव्हतो.’
हेंड्रिक्सने ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी सामने ११ वनडे सामने आणि ११ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ४०४ धावा केल्या आहेत. तो ऑक्टोबर २०१७ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला आहे.