रोहित शर्मा, ख्रिस गेल यांचा समावेश असणाऱ्या त्या यादीत आता मॉर्गनचेही नाव सामील

काल(16 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडला. सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या कालच्या विजयात कर्णधार ओएन मॉर्गनने नाबाद तुफानी अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 22 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 7 षटकाराचा समावेश आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 षटकार मारण्याचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील 5 वा तर इंग्लंडचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

त्याचे आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 89 सामन्यात 105 षटकार झाले आहेत. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. गेलनेही 105 षटकार मारले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने 108 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 127 षटकार मारले आहेत.

काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 223 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॉस बटलर(57), जॉनी बेअरस्टो(64) आणि मॉर्गनने अर्धशतके केली. त्यामुळे इंग्लंडने 223 धावांचे आव्हान 19.1 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

127 षटकार – रोहित शर्मा

119 षटकार – मार्टिन गप्टिल

107 षटकार – कॉलिन मुनरो

105 षटकार – ख्रिस गेल

105 षटकार – ओएन मॉर्गन

You might also like