अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी (४ मार्च) भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
अक्षरची पुन्हा कमाल
अहमदाबाद हे अक्षरचे घरचे मैदान असून त्याने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या झॅक क्रॉली, डॉमनिक सिब्ली, डॅनिएल लॉरेन्स आणि डॉमनिक बेस यांना बाद केले. त्याच्या पहिल्या डावातील गोलंदाजी प्रदर्शन २६ षटके ६८ धावांत ४ विकेट्स असे राहिले. यासह त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्या ५ कसोटी डावांपैकी ४ डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
त्यामुळे साल २००० नंतर कारकिर्दीतील पहिल्या ५ कसोटी डावात सर्वाधिकवेळा ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो केवळ दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा अजंता मेंडिस आहे. अजंता मेंडिसने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्या पाचही डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे मेंडिस हा कसोटी इतिहासातील असा दुसराच खेळाडू आहे, ज्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या पाचही डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याआधी १८९० साली जेजे फेरिस यांनी असा कारनामा केला होता.
अक्षरची पहिल्या २ सामन्यांतील कामगिरी
अक्षरने चेन्नईला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करताना दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने अहमदाबादला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या.
पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व
सध्या सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १२ षटकात १ बाद २४ धावा केल्या आहे. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहेत.
त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही.
भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितला हे काय झालं? झेल घेत रहाणेकडे केलं अपील, व्हिडिओ होतोय व्हायरल
मैदानात आक्रमक खेळी आणि मैदानाबाहेर रोमँटिक; ग्लेन मॅक्सवेल सोशल मीडियावर होतोय ट्रेंड





