अहमदाबाद। शुक्रवारी (३० एप्रिल) नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमयर लीग २०२१ मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने ३४ धावांनी जिंकला. पंजाबच्या या विजयात आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचेही महत्त्वाचे योगदान होते. त्याने या सामन्यात खेळताना आक्रमक खेळी केली. दरम्यान, त्याने एका विक्रमाला गवसणीही घातली.
ख्रिस गेलचे एका षटकात ५ चौकार
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलसह सलामीला फलंदाजीसाठी उतरलेला प्रभसिमरन सिंग लवकर बाद झाला. त्यामुळे ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने राहुलला चांगली साथ देताना आक्रमक खेळ केला.
दरम्यान, त्याने काईल जेमिसनने गोलंदाजी केलेल्या ६ व्या षटकात ५ चौकारांसह २० धावा वसूल केल्या होत्या. त्याने या षटकातील पहिल्या ४ चेंडूंवर सलग ४ चौकार मारले होते. पाचव्या चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर त्यानं अखेरच्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकला.
त्यामुळे आयपीएलमध्ये बेंगलोरविरुद्ध एका षटकात ५ किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००८ साली शेन वॉटसनने बेंगलोरविरुद्ध खेळताना प्रविण कुमारने गोलंदाजी केलेल्या एका षटकात ५ चौकार मारले होते. तर २०१२ सालच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेने बेंगलोरविरुद्ध खेळताना अरविंदने गोलंदाजी केलेल्या एका षटकात सलग ६ चौकार मारले होते.
गेलची महत्त्वपूर्ण खेळी
गेलने केएल राहुलसह दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. यादरम्यान त्याने २४ चेंडूत ४६ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.
पंजाबचा विजय
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. पंजाबकडून केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर गेलने ४६ धावा केल्या. त्याचबरोबर हरप्रीत ब्रारने १७ चेंडूच नाबाद २५ धावांचे योगदान दिले. बेंगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल, १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला २० षटकात ८ बाद १४५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार(३१), हर्षल पटेल(३१) आणि काईल जेमिसन(३०) यांनाच दोन आकडी धावसंख्या ओलांडता आली.
महत्त्वाच्या बातम्या –
हरप्रीत ब्रारची कमाल! एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सला बाद करत केला ‘हा’ विक्रम
कौतुकास्पद! सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील महिला क्रिकेटपटूने केले रक्तदान