भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक २०२१ चा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने योग्य सिद्ध केला. पहिल्या षटकात शाहिनने रोहित शर्माला पायचीत करून माघारी धाडले तर आपल्या पुढच्या षटकात त्याने केएल राहुलला बाद करून खळबळ माजवली. पण दुसऱ्या टोकावर कर्णधार विराट कोहली टिकून राहिला आणि अर्धशतक झळकावले आणि एका विक्रमाला गवसणी देखील घातली.
टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा पराक्रम विराट कोहलीने केला आहे. याआधी तो ख्रिस गेलसोबत तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. ख्रिस गेलने नऊ वेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत ५० धावांचा आकडा पार केला आहे. तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आहे. त्याने सात वेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम विराट कोहलीने नाणेफेक गमावली. त्यानंतर भारतीय संघाने सहा धावांच्या आत रोहित शर्मा (0) आणि केएल राहुल (३) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. सूर्यकुमार यादव ११ धावा करून बाद झाला. त्याला हसन अलीने बाद केले. ५० धावा करण्यासाठी भारतीय संघाला तब्बल ९ षटके लागली.
रिषभ पंतला लेगस्पिनर शादाब खानने बाद केले. पंतने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. कोहलीने ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा १३ धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्यालाही फक्त ११ धावा करता आल्या. कोहलीने ४९ चेंडूंचा सामना केला. आपल्या खेळीत त्याने ५ चौकार आणि एक षटकार लगावला आणि ५७ धावा केल्या. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १५१ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानकडून सलामीला उतरलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने भारतीय गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखले. या दोघांनीही शेवटपर्यंत एकही विकेट न देता संघाला १७.५ षटकात १५२ धावा करुन देत विजय मिळवून दिला. बाबरने नाबाद ६८ आणि रिझवानने नाबाद ७९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक: श्रीलंकेचा सलग चौथा विजय, बांगलादेशला पाच विकेट्स राखून चारली पराभवाची धूळ
भर मैदानात राडा! बांगलादेशच्या फलंदाजाला भिडला श्रीलंकन गोलंदाज, बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये रंगला ‘मीम्स वॉर’; ‘मौका-मौका’ सोशल मीडियावर ट्रेंड