क्रिकेट हा तसा खूप जुना खेळ आहे. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होऊन जवळपास शतकं लोटली. ज्यामध्ये काळानुसार क्रिकेटच्या या स्वरुपात देखील अनेक बदल झाले. क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम आणले गेले. त्यातील काही कायम राहिले, तर काही खूप विचाराअंती काढून टाकण्यात आले. क्रिकेटमध्ये आजही असे अनेक नियम आहेत. ज्यामुळे केवळ चाहतेच नव्हे, तर अनेक खेळाडू देखील संभ्रमात असतात. त्यातीलच एक म्हणजे ‘अंपायर्स कॉल’.
नुकतेच इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लीड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा चांगली खेळी करत होता. त्याने अर्धशतक देखे लगावले होते. मात्र, इंग्लिश गोलंदाज ओली रोबिन्सनच्या गोलंदाजीवर चेंडू रोहितच्या पायाला लागला. आणि गोलंदाजाने अपील केले असता, मैदानातील पंचांनी रोहितला बाद घोषित केले. ज्यावर रोहितने डिसिजन रेव्ह्यू सिस्टम घेतला (डीआरएस) होता.
यानंतर थर्ड अंपायरने बॉल ट्रेकिंगद्वारे पडताळणी करायला सुरुवात केली. ज्यात दिसत होते की, चेंडू लाईनच्या बाहेर टप्पा घेऊन फलंदाजाजवळून जात होता. मात्र, चेंडू खूप लेग साइडला होता. यादरम्यान रिप्लेमध्ये स्पष्ट जाणवत होते की, चेंडूचा अत्यंत अल्प भाग स्टंपला लागत होता. मात्र, तरीही थर्ड अंपायरने अंपायर्स कॉल म्हणून रोहितला बाद दिले. कारण मैदानातील पंचांनी रोहितला आधीच बाद दिले होते.
नेमकं काय आहे अंपायर्स कॉल?
अंपायर्स कॉल क्रिकेटमधील डीआरएसचा एक भाग आहे. जेव्हा एखादा फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानातील पंचांच्या निर्णयावर नाखूष असतो, त्यावेळी तो डीआरएस घेत असतो. त्यावेळी थर्ड अंपायर म्हणजेच टीव्ही अंपायर बॉल ट्रेकिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्णय देत असतो. अशावेळी जर चेंडू आणि स्टंप यांच्यातील अंतर खूप कमी असेल किंवा यामध्ये संभ्रम निर्माण होत असेल, तर थर्ड अंपायर याला अंपायर्स कॉल म्हणून करार देतात. म्हणजेच मैदानातील पंचांनी जो निर्णय घेतला असेल, तोच निर्णय अंतिम निर्णय म्हणून राहील.
असाच किस्सा याआधी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात झाला होता. याच वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी देखील अंपायर्स कॉलचा हा विवाद खूप गाजला होता आणि या मुद्द्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील खूप टीका केली होती.
त्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी मिळून जवळपास ६५ रिव्ह्यू घेतले होते. त्यातील तब्बल ५३ रिव्ह्यू खराब झाले होते. तसेच यातील १६ निर्णय असे होते, ज्याला अंपायर्स कॉल देण्यात आले होते.
या संपूर्ण घटनेनंतर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या (आयसीसी) समितीची एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये अंपायर्स कॉल असावा की, नसावा यावर चर्चा झाली होती. या बैठकीत अनेक संघातील माजी कर्णधारांसोबत आंतरराष्ट्रीय पंच देखील सामील झाले होते. ज्यानंतर या बैठकीत अंपायर्स कॉल कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच क्रिकेट नियमांचे संरक्षण करणाऱ्या एमसीसीने फेब्रुवारीमध्ये याबाबत विराट कोहलीचे समर्थन केले होते. ज्यात त्यांचे मत होते की, हा निर्णय दर्शकांना देखील समजण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. असे असले तरी, एमसीसीचे काही अधिकारी अंपायर्स कॉलच्या समर्थनात होते, तर काही याच्या विरोधात होते. मात्र, शेवटी आयसीसीने अंपायर्स कॉलला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या –
–रिषभ, साहा नव्हे, तर चौथ्या कसोटीत ‘या’ खेळाडूला यष्टीरक्षक म्हणून खेळवा, ऑसी दिग्गजाचा सल्ला
–इंग्लंडचा ‘हा’ ३९ वर्षीय गोलंदाज होम ग्राउंडवरील कसोटीनंतर घेईल निवृत्ती, संघ सहकाऱ्याचा दावा
–‘स्टेनगन’ अखेर थंडावली! दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम






