इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हेनमध्ये बदल करावा असा सल्ला दिला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने रिषभ पंतला संघाबाहेर करून युवा फलंदाजाला संधी द्या, अशी मागणी केली आहे.
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत अवघ्या ८७ धावा करण्यात यश आले आहे. त्यामुळे रिषभ पंतला बाहेर करून वृद्धीमान साहाला संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
परंतु, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने रिषभ पंतला बाहेर करून केएल राहुलला यष्टीरक्षण करू द्या, ज्यामुळे भारतीय संघाला अतिरिक्त फलंदाज खेळवता येईल, असा सल्ला दिला आहे.
ब्रॅड हॉगने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “हे केएल राहुलसाठी मोठे आव्हान असेल, कारण त्याला सलामी फलंदाजी आणि यष्टीरक्षण देखील करावे लागेल. परंतु, यामुळे भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. केएल राहुलने यापूर्वी देखील असे केले आहे. असे झाले तर ६ व्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. सूर्यकुमार यादवसाठी हे स्थान योग्य असेल, हा भारतीय संघासाठी योग्य पर्याय असेल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “हे खूप कठीण कार्य आहे. परंतु, मला विश्वास आहे की, केएल राहुल असे करण्यास सक्षम आहे. परंतु, मला नाही वाटत की, या सामन्यात ते संघात बदल करतील. जर पुढील सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला, तर कदाचित शेवटच्या सामन्यात असा बदल होऊ शकतो.”
या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबर पासून ओव्हल पासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘स्टेनगन’ अखेर थंडावली! दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
दोन नव्या आयपीएल संघांसाठी बीसीसीआयने जाहीर केले टेंडर, ‘असे’ आहेत नियम आणि अटी
लीड्स ते लंडन, भारतीय क्रिकेटर्स लक्झरी ट्रेनने पोहोचले ओव्हलला; पाहा प्रवासातील भारी फोटो