पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात आज(13 ऑक्टोबर) भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला.
या विजयामुळे भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. तसेच भारताने मायदेशात सलग 11 कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. भारताने फेब्रुवारी 2013 पासून आत्तापर्यंत मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
याआधी कोणत्याही संघाला असा पराक्रम करता आलेला नव्हता. याआधी मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर संयुक्तरित्या होता. पण भारताने आता ऑस्ट्रेलियाच्या मायदेशातील सलग 10 कसोटी मालिका विजयाच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने दोन वेळा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पण त्यांना दोन्हीवेळेस सलग 11 व्यांदा मायदेशात कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आले होते. मात्र आता भारतीय संघाने मायदेशात सलग 11 मालिका जिंकत हा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह वॉ आणि मार्क टेलर यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 दरम्यान पहिल्यांदा सलग 10 कसोटी मालिका मायदेशात जिंकल्या होत्या. त्यानंतर रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जूलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान दुसऱ्यांदा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला.
मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवणारे संघ –
11* – भारत (फेब्रुवारी 2013 – आत्तापर्यंत)
10 – ऑस्ट्रेलिया (नोव्हेंबर 1994 – नोव्हेंबर 2000)
10 – ऑस्ट्रेलिया (जूलै 2004 – नोव्हेंबर 2008)
8 – वेस्ट इंडीज (मार्च 1976 – फेब्रुवारी 1986)