अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २१ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. पण याच सामन्यादरम्यान, कोलकाताचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुनील नारायणच्या नावावर एक नकोशा विक्रमाची नोंद झाली.
सुनील नारायणने केला हा नकोसा विक्रम
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत कोलकाताला १२४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी पहिल्या २ षटकातच नितीश राणा(०) आणि शुबमन गिल(९) या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. एवढेच नाही तर तिसऱ्या षटकात रवी बिश्नोईने घेतलेल्या अफलातून झेलामुळे सुनील नारायणलाही शुन्यावर बाद होऊन माघारी परतावे लागले.
आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना शुन्यावर बाद होण्याची नारायणची ही १० वी वेळ होती. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये कोलकाताकडून सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याच्या यादीत गौतम गंभीरची बरोबरी केली आहे. गंभीरदेखील आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना १० वेळा शुन्यावर बाद झाला आहे.
आयपीएलमध्ये कोलकाताकडून सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारे क्रिकेटपटू
१० – सुनील नारायण
१० – गौतम गंभीर
८ – पियूष चावला
८ – युसूफ पठाण
८ – मनोज तिवारी
कोलकाताने मिळवला विजय
या सामन्यात पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतर कोलकाताकडून कर्णधार ओएन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्यांनी ६६ धावांची भागीदारी केली. पण त्रिपाठी ४१ धावांवर बाद झाला. पण अखेर मॉर्गनने दिनेश कार्तिकच्या साथीने १२४ धावांचे आव्हान १७ व्या षटकात पूर्ण करत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मॉर्गन ४० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला. तर कार्तिकने नाबाद १२ धावा केल्या.
पंजाबकडून मोझेस हेन्रिक्स, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि दीपक हूडाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाबला २० षटकात ९ बाद १२३ धावांवर रोखले. पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, अन्य कोणाला फार खास काही करता आले नाही.
कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्स आणि सुनील नारायणने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : वाह रे पठ्ठ्या! राहुल त्रिपाठीने चक्क कोलांटीउडी मारत घेतला झेल