भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. अशात आता याच स्पर्धेतील दुसरा सामना भारताने नेदरलँड्सविरुद्ध खेळला. या सामन्यातही भारताने विजय साकारत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. या सर्वांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने विक्रमांचे मनोरे रचले. त्याने नेदरलँड्सविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लावला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या भारताची पहिली विकेट केएल राहुल (KL Rahul) याच्या रूपात 11 धावांवर गेली. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. यावेळी विराटने अशी काही फलंदाजी केली, ज्याने त्याच्या नावावर विक्रम रचला गेला. त्याने यावेळी 44 चेंडूत नाबाद 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 3 चौकारही मारले. यासह तो सेना देशात सर्वाधिक अर्धशतके मारणारा भारतीय फलंदाज ठरला.
FIFTY for @imVkohli 👏👏
A fine half-century for Kohli off 37 deliveries. His 35th in T20Is.
Live – https://t.co/Zmq1aoK16Q #INDvNED #T20WorldCup pic.twitter.com/6dBkMw6Loq
— BCCI (@BCCI) October 27, 2022
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेना देशात खेळताना सर्वाधिक 49 अर्धशतके झळकावली आहेत. या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांसारख्या दिग्गजांनाही मागे सोडले आहे. सचिनने सेना देशात खेळताना 48 अर्धशतके मारली आहेत. तसेच, राहुल द्रविड यांनी सेना देशात खेळताना एकूण 46 अर्धशतके केली आहेत.
सेना देशात सर्वाधिक अर्धशतके मारणारे भारतीय फलंदाज
49 अर्धशतके- विराट कोहली*
48 अर्धशतके- सचिन तेंडुलकर
46 अर्धशतके- राहुल द्रविड
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने दिलेल्या 180 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या नेदरलँड्स संघाला 9 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 56 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात भारताकडून 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्यामुळे सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकलो रे! नेदरलँड्सला पराभूत करत भारताची विजयी घोडदौड सुरूच, 56 धावांनी सामना घातला खिशात
सूर्या भाऊंनी गाजवलं 2022 वर्ष! विराटच्याही एक पाऊल पुढं निघाला पठ्ठ्या, पाहा काय केलाय विक्रम