मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मंगळवारी (२९ डिसेंबर) दुसरा कसोटी सामना जिंकला. या विजयाबरोबरच भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी फारच सुमार झाली.
मेलबर्नला झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद १९५ धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशानेने सर्वोच्च ४८ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात २०० धावांवर ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद झाला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून युवा कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. म्हणजेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून एकाही क्रिकेटपटूला ५० धावाही करता आल्या नाहीत.
दुसरीकडे भारताकडून अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ११२ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रहाणेचे हे कारकिर्दीतील असे चौथे कसोटी शतक होते, ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील एकाही क्रिकेटपटूला सामन्यात अर्धशतकही करता आलेले नाही. याआधी असा पराक्रम केवळ डॉन ब्रॅडमन यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील ४ शतके अशा कसोटी सामन्यात केली आहेत, ज्यावेळी विरोधी संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही.
रहाणेच्या या ४ शतकांपैकी २ शतके एकाच सामन्यातील आहेत. त्याने दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१५ साली दोन्ही कसोटी डावात शतके केली होती. त्याने पहिल्या डावात १२७ आणि दुसऱ्या डावात नाबाद १०० धावा केल्या होत्या. त्या सामन्यावेळी दक्षिण आफ्रिकच्या खेळाडूंना मात्र एकाही डावात ५० धावाही करता आल्या नव्हत्या.
रहाणेने तिसरे शतक वेस्ट इंडिज विरुद्ध नॉर्थ साऊंडमध्ये आले. २०१९ साली भारताने केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील या कसोटी सामन्यात रहाणेने १०२ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात देखील वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अर्धशतकही करता आले नव्हते. यानंतर आता मेलबर्न कसोटीतही असेच झाले. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूने अर्धशतकही केले नाही. तर दुसरीकडे रहाणेने शतकी खेळी केली.
विरोधी संघातील फलंदाज अर्धशतकही करता न आलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
४ – अजिंक्य रहाणे
४ – डॉन ब्रॅडमन
३ – कोलिन कॉड्रे
३ – जॅक कॅलिस
३ – गोर्डन ग्रीनिज
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
अश्विनच्या जाळ्यात का फसतोय जगातील अव्वल फलंदाज? खुद्द स्मिथनेच सांगितले कारण