भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रोहितने स्पर्धेतील 29व्या सामन्यात रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध विक्रमांचे मनोरे रचले. तो कर्णधार म्हणून आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. याव्यतिरिक्त त्याने आता भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. तो सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्यापासून थोडाच दूर आहे.
रोहितचा विक्रम
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानावर उतरले होते. यावेळी भारताची सुरुवात खूपच खराब झाली, भारताने गिल (9) आणि विराट कोहली (0) यांच्या विकेट्स पॉवरप्लेमध्ये गमावल्या. मात्र, रोहितने एका बाजूने टिच्चून फलंदाजी केली. त्याने डावातील 21वे षटक टाकत असलेल्या आदिल रशीद याच्या तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार मारला. यावेळी त्याच्या 58 चेंडूत 48 धावा झाल्या. या धावा करताच त्याने खास विक्रम केला.
रोहित शर्मा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. त्याने 457व्या सामन्यात 18000 धावांचा टप्पा पार केला. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 45 शतके आणि 99 अर्धशतके केली आहेत.
यादीत सचिन अव्वलस्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वलस्थानी आहे. सचिनने कारकीर्दीत एकूण 34357 धावा केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याच्या नावावर 26121 धावा आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याने 24064 धावा केल्या आहेत. यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly) चौथ्या स्थानी असून त्याच्या नावावर 18433 धावा आहेत. तसेच, रोहित पाचव्या स्थानी असून तो 18030* धावांवर खेळत आहेत. अशात रोहित गांगुलीचा विक्रम मोडण्यापासून थोडाच दूर आहे. (Most International runs for India )
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
34357 – सचिन तेंडुलकर
26121 – विराट कोहली
24064 – राहुल द्रविड
18433 – सौरव गांगुली
18001 – रोहित शर्मा*
हेही वाचा-
झहीर टॉपला असलेल्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर, नकोशा विक्रमात सचिनला टाकले मागे
विश्वचषक 2023मध्ये भारत पहिल्यांदाच करणार ‘हे’ काम, इंग्लंडने जिंकला टॉस; Playing XIमध्ये नाही कोणताच बदल