---Advertisement---

‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्यात परदेशी खेळाडूंचा बोलबाला; रोहित-धोनी आहेत ‘या’ क्रमांकावर

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 10:00 AM
MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)
---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर हा हंगाम बंद दाराआड खेळला जाणार असला तरी, या हंगामासाठी सर्व खेळाडू आणि चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अनेक नावाजलेले खेळाडू पुन्हा एकदा आपल्या विलक्षण खेळाने क्रिकेटप्रेमींची मनोरंजन करण्यास सज्ज झालेत.

आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यागणिक अनेक विक्रम बनले आणि मोडले जातात. अशाच प्रकारे आज आपण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या पाच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.

१) एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू असलेला एबी डिव्हिलियर्स हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. डिव्हिलियर्सने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत १६९ सामने खेळताना २३ सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.

२) ख्रिस गेल
‘युनिव्हर्स बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गेलने आयपीएलमधील बरेचसे विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व पंजाब किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व करताना त्याने १३२ सामन्यात २२ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे.

३) रोहित शर्मा
आयपीएलचा इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितने आयपीएलमध्ये २०० सामने खेळत १८ वेळा सामनावीर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

४) डेव्हिड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी विदेशी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याच नेतृत्वात सनरायझर्सने २०१६ मध्ये आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १४२ सामन्यात १७ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत.

५) एमएस धोनी
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्सला तीन वेळा आयपीएल जिंकून देणारा एमएस धोनी हा सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक २०४ सामने खेळताना १७ वेळा सामनावीर होण्याचा मान मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज

आयपीएलच्या इतिहासातील ३ सर्वात रोमांचक अंतिम सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---