पुणे। आज(13 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर पार पडलेल्या या सामन्याचा सामनावीर पुरस्कार भारताचा कर्णधार विराट कोहलीला देण्यात आला.
विराटने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 336 चेंडूत नाबाद 254 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 33 चौकार आणि 2 षटकार मारले. या खेळीमुळेच विराटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे.
विराटचा हा कसोटी कारकिर्दीतील 9 वा सामनावीर पुरस्कार आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीयांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याच्यापुढे सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे आहे. या तिघांना अनुक्रमे प्रत्येकी 14, 11 आणि 10 सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत.
विराटने या यादीत कपिल देव आणि विरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. कपिल आणि सेहवाग यांनी प्रत्येकी 8 वेळा कसोटीमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.