सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत अत्यंत रोमांचक घडीवर आली आहे. चौथ्या दिवसापर्यंत ४०० हून अधिक धावांची आघाडी घेत यजमान संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. मात्र भारतीय फलंदाज रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या दिवशी शतकी भागिदारी साकारत विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. दरम्यान पंतने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारतीय संघाने २ बाद ९८ धावांपासून पुढे पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला होता. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लायन याने भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या फिरकीत फसवले आणि अवघ्या ४ धावांवर रहाणेला माघारीला धाडले. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज पंतने पुजारासोबत मिळून डावाला चालना दिली.
पंत आणि पुजाराने मिळून लंच ब्रेकपर्यंत शतकी भागिदारी रचली. यात पंतच्या ७३ धावांच्या तूफानी खेळीचा समावेश आहे. ९७ चेंडूत ३ खणखणीत षटकार आणि ८ चौकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. यासह पंत ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये १० कसोटी डाव खेळत पंतने ४८७ धावा केल्या आहेत.
पंतपुर्वी माजी भारतीय यष्टीरक्षक सय्यद किरमानी आणि एमएस धोनी यांनी ऑस्ट्रेलियात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. किरमानी हे कसोटी सामन्यातील १७ डावात ४७१ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक ठरले होते. तर धोनी १८ डावात ३११ धावा करत दुसऱ्या क्रमांकावर होता. परंतु आता पंतने या दोन्ही दिग्गजांना पिछाडीवर टाकत अव्वलस्थान पटकावले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पंतने नाही केले यष्टीरक्षण
सिडनी कसोटीतील भारतीय संघाच्या पहिल्या डावात तिसर्या दिवशी फलंदाजी करताना रिषभ पंतच्या डाव्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. पहिल्या डावात ६७ चेंडूत ३६ धावा करणार्या पंतला पॅट कमिन्सच्या शॉर्ट चेंडूवर पूल शॉट खेळताना दुखापत झाली होती. तो पट्टी बांधून फलंदाजी करत होता. मात्र त्या वेगाने धावा काढू शकला नाही. तो जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीच्या मागे झेल देवून बाद झाला. आयसीसीच्या नवीन नियमानुसार पंतची जागा वृद्धीमान साहाने घेतली होती आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याच्याजागी यष्टीरक्षण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : रिषभ पंतच्या शतकाने भारताच्या आशा पल्लवित; भारताला अजूनही २०१ धावांची गरज
सिराज विरुद्ध वापरले गेले ‘हे’ अपशब्द, बीसीसीआयच्या रिपोर्टमध्ये झाला खुलासा