---Advertisement---

पहिल्या डावात १८, दुसऱ्या डावात २४; कानपूर कसोटीत सरासरी फलंदाजी करुनही विलियम्सनचा ‘भीमपराक्रम’

---Advertisement---

न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा कर्णधार केन विलियम्सन सध्या खराब फलंदाजी फॉर्मचा सामना करत आहे. या ३१ वर्षीय फलंदाजाची भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरी अतिशय सुमार राहिली. तरीही त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या यांच्यात कानपूरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केवळ न्यूझीलंडच्या सलामीवीरांना मोठ्या खेळी करता आल्या. त्यांना वगळता या डावात न्यूझीलंडच्या इतर सर्व फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. यामध्ये कर्णधार विलियम्सनचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ६४ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या मदतीने तो फक्त १८ धावा करू शकला.

त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याची ही सुमार कामगिरी पाहायला मिळाली. केवळ ३ धावांवर संघाला पहिला धक्का बसल्यानंतर विलियम्सनकडून न्यूझीलंडला कर्णधार खेळीची अपेक्षा होती. परंतु ११२ चेंडू खेळताना ३ चौकारांच्या मदतीने अवघ्या २४ धावा करत त्याने पव्हेलियनचा रस्ता पकडला.

अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात मिळून विलियम्सनने ४२ धावा जोडल्या. या छोटेखानी खेळीसह त्याने कसोटी कारकिर्दीतील मोठ्या विक्रमात प्रथमस्थान गाठले आहे. तो न्यूझीलंडकडून पहिल्या १५० कसोटी डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. ८० कसोटी सामन्यातील १५० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने सर्वाधिक ७२७२ धावा फटकावल्या आहेत.

याबाबतीत त्याने आपलाच सहकारी आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर याला पछाडले आहे. टेलरने त्याच्या पहिल्या १५० कसोटी डावांमध्ये ६२६६ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडचे माजी फलंदाज स्टिफन फ्लेमिंग हे ५५६६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त मार्टिन क्रो, जॉन राईट हेदेखील या टॉप-५ फलंदाजांमध्ये आहेत.

न्यूझीलंडसाठी पहिल्या १५० कसोटी डावात सर्वाधिक धावा-
७२७२ धावा: केन विलियम्सन*
६२६६: रॉस टेलर
५५६६: स्टिफन फ्लेमिंग
५४४४: मार्टिन क्रो (१३१ डाव)
५३३४: जॉन राइट (१४८ डाव)

महत्त्वाच्या बातम्या-

विराटला येऊदेत, तो तुमची हजेरी घेईल! ‘या’ कारणामुळे पंच नितिन मेनन भारतीय चाहत्यांकडून झाले ट्रोल

जे कर्णधार विराटलाही नाही जमलं, ते रहाणेने फक्त ६ कसोटीत करून दाखवलं; धोनीची केलीय बरोबरी

जावयाचा राखला मान! गावसकरांच्याच हस्ते झाले ग्रीन पार्कमध्ये भूमिपूजन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---