नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला. हा सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडला आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा करत दोन्ही डावात मिळून 200 धावा केल्या आहेत.
तसेच विराटने 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील एजबस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही 200 धावा केल्या होत्या. तर लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या कसोटीत 40 धावा केल्या होत्या.
त्यामुळे त्याच्या या मालिकेत पहिल्या तीन सामन्यांमध्येच 440 धावा झाल्या आहेत. याबरोबरच त्याने इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
सचिनने 1996 ला झालेल्या कसोटी मालिकेत 428 धावा केल्या होत्या. यात त्याने दोन शतके आणि 1 अर्धशतक केले होते.
विराट सध्या या विक्रमाच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तसेच इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेतील अजून दोन कसोटी सामने बाकी असल्याने त्याला ‘द वॉल’ राहुल द्रविडचाही विक्रम मोडण्याची संधी आहे.
द्रविडने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या 602 धावा या यादीत अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच या विक्रमाच्या यादीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये द्रविडचे नाव दोन वेळा आहे. द्रविडने 2011 च्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतही 461 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1979 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 542 धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
602 धावा – राहुल द्रविड (2002)
542 धावा – सुनील गावस्कर (1979)
461 धावा – राहुल द्रविड (2011)
440 धावा – विराट कोहली (2018) (अजून 2 कसोटी सामने बाकी)
428 धावा – सचिन तेंडुलकर (1996)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचे संपुर्ण वेळापत्रक जाहीर, फायनल होणार मुंबईत
–भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीतील ५ खास विक्रम
–केरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत