जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेकदा चौकार आणि षटकारांचा वर्षांव होताना दिसतो. आयपीएल इतिहासात आतापर्यंत अनेक जबरदस्त फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी ताबडतोब खेळी केल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे ब्रेंडन मॅक्युलम. मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १५८ धावांची तूफानी खेळी केली होती. यामध्ये १० चौकारांचा आणि १३ षटकारांचा समावेश होता.
मॅक्युलमसह आयपीएलमध्ये ताबडतोब फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत हार्दिक पंड्या, ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, शेन वॉटसन, सुरेश रैना, एमएस धोनी, जोस बटलर, ऍरोन फिंच अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, कोणत्याही फलंदाजाला ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी चौकार आणि षटकारांची गरज भासते. जेवढे जास्त चेंडू सीमारेषेबाहेर जातात, तेवढी त्या फलंदाजाच्या प्रसिद्धीत वाढ होते तसेच तो खेळताना धावाही वेगाने करु शकतो.
आज आपण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
ख्रिस गेल
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ‘युनिव्हर्स बॉस’ नावाने ओळखला जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व पंजाब किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले असून, त्याच्या नावे १३२ सामन्यात तब्बल ३४९ षटकार आहेत. या वर्षी कदाचित पहिल्याच सामन्यात तो आयपीएलमध्ये ३५० षटकार लगावणारा पहिला फलंदाज बनू शकतो.
एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा महत्त्वपूर्ण खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १६९ सामने खेळत २३५ षटकार ठोकले आहेत. डिव्हिलियर्सकडे आयपीएलच्या आगामी हंगामात २५० षटकार पूर्ण करण्याची संधी आहे.
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्सला तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा यशस्वी कर्णधार एमएस धोनी या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. सोबतच, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाजही ठरतो. धोनीने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक २०४ सामने खेळले असून यामध्ये २१६ वेळा चेंडू प्रेक्षकांत भिरकावला आहे.
याशिवाय रोहित शर्मा (२१३), विराट कोहली(२०१) व कायरन पोलार्ड (१९८) हे सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप ५मध्ये येतात.