अहमदाबाद। विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. इंडियन प्रीमीयर लीगमध्ये तो सध्या सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. पण गुरुवारी (३० एप्रिल) आयपीएलच्या १४ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना तो एका नकोशा विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
विराटची चांगली सुरुवात, पण…
गुरुवारी, पंजाबने बेंगलोरसमोर १८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट देवदत्त पडीक्कलसह सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, पडीक्कल लवकर बाद झाला. पण त्यांनंतर रजत पाटिदारने विराटची चांगली साथ दिली. त्यांची भागीदारी रंगतही होती. मात्र, ११ व्या षटकात हरप्रीत ब्रारने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर विराट ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला.
विराटची आयपीएलमध्ये त्रिफळाचीत होण्याची ही ३२ वी वेळ होती. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा त्रिफळाचीत होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर शेन वॉटसन आहे. तो ३५ वेळा त्रिफळाचीत झाला आहे. तर शिखर धवन ३३ वेळा आयपीएलमध्ये त्रिफळाचीत झाला असून तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराटची आयपीएल कारकिर्द
विराटने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९९ सामन्यांत ३७.९७ च्या सरासरीने ६०७६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ५ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
पंजाबचा विजय
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. पंजाबकडून केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर गेलने ४६ धावा केल्या. त्याचबरोबर हरप्रीत ब्रारने १७ चेंडूच नाबाद २५ धावांचे योगदान दिले. बेंगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल, १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला २० षटकात ८ बाद १४५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार(३१), हर्षल पटेल(३१) आणि काईल जेमिसन(३०) यांनाच दोन आकडी धावसंख्या ओलांडता आली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये बेंगलोरविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा गेल रहाणे आणि वॉटसननंतर तिसराच फलंदाज
हरप्रीत ब्रारची कमाल! एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सला बाद करत केला ‘हा’ विक्रम