आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ला अखेर विजेता संघ मिळाला. रविवारी (८ मार्च) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. हा सामना जिंकताच भारताने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक उंचावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत शतकांचा इतिहास झाला. म्हणजे एका टी२० विश्वचषकाच्या हंगामात सर्वाधिक अशी ७ शतके याच हंगामात झाली. एकंदर या स्पर्धेच्या दहाव्या आवृत्तीत फलंदाजांची चंगळ दिसली आणि गोलंदाज चिंतेत दिसले.
फलंदाजांसाठी उत्तम ठरलेल्या या स्पर्धेत अनेक गोलंदाजांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत भारताचे दोन खेळाडू अव्वल स्थानावर आहेत. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, ब्लेसिंग मुजरबानी, आदिल राशिद, लुंगी एनगिडी आणि रचिन रविंद्र यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्यातच यूएसएच्या शेडली वॅन शाल्कविक याने तर भारताबरोबर पाकिस्तानविरुद्धही ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
टी२० विश्वचषक २०२६मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी बुमराहने केली आहे. त्याने अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेत या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ८ सामन्यांमध्ये २८ षटके टाकली आणि १४ विकेट्स घेतल्या. तसेच त्याची इकॉनॉमी रेटही सर्वोत्तम राहिला – ६.२१. त्याने १७४ धावा दिल्या.
या यादीत दुसऱ्या स्थानावर फिरकीपटू चक्रवर्ती आहे. त्याने ९ सामन्यात एकूण ३१ षटके टाकली आणि ९.२६ इकॉनॉमी रेटसह १४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने २८७ धावा दिल्या. या यादीत तिसऱ्या स्थानावर यूएसएचा वेगवान गोलंदाज शाल्कविक आहे. त्याने केवळ ४ सामन्यात १३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने एकूण १४.५ षटके टाकताना ६.८१च्या इकॉनॉमी रेटने १०१ धावा दिल्या.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुजरबानी चौथ्या स्थानावर आहे. त्याने ६ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ७.८९ एवढा राहिला. पाचव्या स्थानावर इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आदिल आहे. त्याने ८ सामन्यात ८.१५च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या.






