भारतीय दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविड यांचा वारसा पुढे नेत असल्याने चेतेश्वर पुजारा याला भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाते. पुजाराने लहानपणापासूनच स्वत:ला क्रिकेटसाठी झोकून दिले आणि कठोर मेहनतीनंतर इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. पुजाराच्या तेजस्वी क्रिकेट कारकिर्दीमागे त्याच्या वडिलांसह त्याच्या आईचाही मोठा हात आहे. आज जागतिक मातृदिनानिमित्त जाणून घेऊया, पुजाराच्या आईने आपल्या लेकाला मोठा क्रिकेटपटू बनवण्यासाठी केलेल्या त्यागाची कहाणी…
पडद्यामागची खरी नायिका!
चेतेश्वर पुजारा याचे वडील अरविंद पुजारा हे स्वत: एक रणजीपटू होते. त्यामुळे आपल्या मुलालाही एक क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहणे साहजिक होते. अगदी पुजाराला क्रिकेटचे क-ख-ग-घ देखील कळत नसेल, तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटची ओढ लावण्यास सुरुवात केली होती. परंतु पुजाराच्या वडिलांप्रमाणे त्याची आई रीना पुजारा यांचेही स्वप्न होते की, आपल्या मुलाने मोठे झाल्यावर भारतासाठी क्रिकेट खेळावे.
विशेष म्हणजे, रीना यांनी स्वत: आपल्या मुलाला पहिली लेदरची बॅट आणि बॉल भेट म्हणून दिली होती. त्यावेळी १५०० रुपयांना मिळणारी बॅट विकत घेण्याइतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. तरीही आपल्या मुलासाठी पोटाची कोंडी करत त्यांनी हप्त्यांमध्ये बॅटचे पैसे भरले होते. एवढेच नव्हे तर, पुजारा ८ वर्षांचा झाल्यानंतर त्याला क्रिकेटचा सराव करताना बॅटिंग पॅडची गरज होती. परंतु तो उंचीला छोटा असल्याने त्याला बाजारातील पॅड व्यवस्थित येत नसत. त्यामुळे आई रीना यांनी स्वत:च्या हातांनी पुजारासाठी पॅड तयार केले होते.
पुढे पुजाराने दिवसरात्र मेहनत करून देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी या स्वरुपात नावलौकिक मिळवला. मात्र आपल्या मुलाला भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांचे कॅन्सरने निधन झाले. परंतु पुजाराने आपल्या दिवंगत आईचे स्वप्न पूर्ण करून दाखवले.
चेतेश्वर पुजाराची कामगिरी
ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराने कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत त्याने भारताकडून ८५ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान ४६.५९च्या सरासरीने ३ द्विशतके आणि एकूण १८ शतकांच्या मदतीने ६२४४ धावा केल्या आहेत.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ४ सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिकेतही त्याने महत्त्वपुर्ण यचोगदान दिले आहे. पुजाराला या कसोटी मालिकेत एकही शतक करण्यात यश आले नाही. परंतु संपूर्ण मालिकेदरम्यान ९२८ चेंडूंचा सामना करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना थकवून सोडले. या कसोटी मालिकेत ३ अर्धशतकांच्या मदतीने त्याने एकूण २७१ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने २-१ च्या फरकाने ही मालिका जिंकली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियन भूमीत सलग दोनवेळा भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकून देण्यात पुजाराने हातभार लावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा, हे घर आहे की हॉटेल? राशिद खानचे आलिशान घर पाहून सीएसकेच्या खेळाडूचे उडाले होश
जगप्रसिद्ध मॉडेलच्या जाळ्यात अडकला ‘हा’ केकेआरचा धुरंधर, एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव
राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे जिवलग वडिलांचे निधन