कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आयपीएल २०२० चा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये होणार असल्याची पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे.
यावर्षी २९ मार्चपासून आयपीएल २०२० ला सुरुवात होणार होती. पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. पण आता अखेर टी२० विश्वचषक अखेर पुढे ढकलला असल्याने आयपीएल २०२० चा मोसम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला विंडो (कालावधी) मिळाली आहे.
आयपीएल यावर्षी खेळवले जाणार असल्याने अनेकांना आनंद झाला आहे. पण यादरम्यान अजूनही एक प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. तो म्हणजे महिलांचे आयपीएल. २०१८ ला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याचे यश पाहुन २०१९ ला आयपीएलमध्ये महिलांच्या ३ संघात ४ टी२० सामन्यांची प्रदर्शनीय मालिका खेळवली गेली.
यानंतर २०२० च्या आयपीएल मोसमादरम्यान महिलांच्या ७ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. विशेष म्हणजे यावर्षी आणखी १ संघ वाढविण्यात आला होता. त्यामुळे ही मालिका ४ संघात होणार होती. महिलांचे हे सामने आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान खेळवण्यात येणार होते. तसेच मागील २ वर्षाप्रमाणे यावर्षीही भारतीय महिला संघातील सध्याचे आणि भविष्यातील स्टार खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळाडूंबरोबर खेळताना दिसणार होते.
परंतू आता जर आयपीएल युएईला हलवण्याचा निर्णय झाला असेल तर महिलांच्या या छोट्या मालिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मागील काही वर्षात महिला क्रिकेटला चांगली लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या क्रिकेटचाही प्रसार व्हावा या कारणाने बीसीसीआय आयपीएलदरम्यान महिलांचे सामने आयोजित करत होते. परंतु आताची परिस्थिती पहाता याबाबत काय निर्णय बीसीसीआय घेणार हे पहावे लागेल. तसेच जर महिलांचे हे सामने नाही झाले तर महिला खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनावरही परिणाम होऊ शकतो.
मागील काही महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या संकटामुळे क्रिकेट ठप्प पडले होते. परंतु नुकतेच इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. तसेच काही देशांत खेळाडूंनी मैदानावर सरावाला सुरुवात केली आहे. तरीही भारतातील परिस्थिती अजून पुर्णपणे सुधारलेली नाही. त्यामुळे जरी काही भारतीय क्रिकेटपटू सरावासाठी मैदानात उतरले असले तरी काही क्रिकेटपटूंना अजून सरावाला सुरुवात करता आलेली नाही.
पण असे असले तरी अजून कोणत्याही क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटबाबत मोठा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता महिला क्रिकेटचे मैदानावर पुनरागमन कधी होणार हे पहावे लागेल.
ट्रेंडिंग घडामोडी –
भारत- पाकिस्तान मालिका होऊ नये, म्हणून हे लोकं घालतात खोडा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ सदस्यीय भारतीय संघाची निवड; धोनीसह या खेळाडूला दिला डच्चू
सचिन तेंडुलकरच्या त्या एका सल्ल्याने वाचवलं होतं विराट कोहलीच करियर






