महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु होत आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते ईगल नाशिक टायटन्स यांच्या दरम्यान खेळला जाईल. हंगामातील पहिलाच सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.
पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद पटकावत रत्नागिरी संघाने आतापर्यंत एमपीएलमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. सलग तिसऱ्या वर्षी एमपीएल जिंकण्याचा त्यांचा मनोदय असेल. दुसरीकडे नाशिकने पहिल्या हंगामात प्ले ऑफ्स तर दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. यावेळी एक पायरी पुढे जात ट्रॉफी होऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करतील.
रत्नागिरी जेट्स संघात बरेचसे खेळाडू मागील वर्षीचे दिसून येतात, जे या संघाला मजबूती देतात. त्यामध्ये कर्णधार अझीम काझी, दिव्यांग हिंगणेकर, धीरज फटांगरे, निखिल नाईक, सत्यजित बच्छाव व कुणाल थोरात यांचा समावेश आहे. साहिल चुरी व मनोज यादव यावेळी प्रथमच रत्नागिरी संघाचा भाग असतील. दुसरीकडे, नाशिक संघाची मदार त्यांचे अनुभवी गोलंदाज व कर्णधार प्रशांत सोलंकी व उपकर्णधार मुकेश चौधरी यांच्यावर असेल. फलंदाजीत मंदार भंडारी, रणजित निकम व अथर्व काळे हे संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी प्रयत्न करतील. नाशिक संघाची सर्वात मोठी ताकद त्यांचे अष्टपैलू असून यामध्ये अर्शिन कुलकर्णी, कौशल तांबे व दिग्विजय देशमुख यांचा समावेश आहे.
एमपीएल 2025 मधील सर्व सामने गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होतील. हंगामाची सुरुवात होत असल्याने खेळपट्टी नवीन असेल. त्यामुळे पहिल्या सामन्यात 180 पेक्षा जास्तच्या उभ्या केल्या जातील. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असेल. हा सामना JioHotstar व Star Sports 2 येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून पाहता येईल.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
रत्नागिरी जेट्स- जय पांडे, धीरज फटांगरे, अझीम काझी (कर्णधार), किरण चोरमले, साहिल चुरी, निखिल नाईक, प्रितम पाटील, दिव्यांग हिंगणेकर, कुणाल थोरात, सत्यजित बच्छाव, प्रदीप दाढे.
इम्पॅक्ट प्लेअर- विजय पावले
ईगल नाशिक टायटन्स- मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, रणजित निकम, कौशल तांबे, अथर्व काळे, योगेश डोंगरे, रोहन दामले, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी (कर्णधार), हरी सावंत, मनोज इंगळे
इम्पॅक्ट प्लेअर- दिग्विजय देशमुख






