‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ख्याती मिळवलेला धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामात खेळताना दिसणार नाही. मात्र, असे असले, तरीही तो आयपीएलशी जोडला राहणार आहे. रैना या हंगामातून नव्या भूमिकेत दिसणार आहे. या हंगामात तो समालोचन करताना दिसणार आहे. आपल्या या इनिंगसाठी तो चांगलाच सज्ज झाला आहे. यासंदर्भात त्याने माध्यमांशी चर्चा केली तसेच याच्याशी निगडीत अनेक गोष्टींबद्दलही तो व्यक्त झाला. यादरम्यान त्याने आयपीएळ २०२२मध्ये कोणत्या खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल, हेही सांगितले.
सुरेश रैनाने (Suresh Raina) सांगितलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोईन अली यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यातल्या त्यात, या सर्वांपेक्षा जास्त लक्ष कोणत्या खेळाडूंवर असेल, तर ते म्हणजे मुंबई इंडियन्सच्या इशान किशनवर (Ishan Kishan). यामागील कारण म्हणजे, किशनची मागील हंगामातील जबरदस्त कामगिरी.
आयपीएलमध्ये यावेळी संघांच्या तयारीबद्दल बोलताना रैना म्हणाला की, “प्रत्येक संघाकडे खूप चांगले मेंटॉर किंवा शानदार प्रशिक्षक असतात, तेव्हा याचा खूप फरक पडतो. त्यामुळे सर्वांना खूप आधार मिळणार आहे.” प्राईस टॅगबद्दल बोलताना रैना म्हणाला की, “ज्या खेळाडूवर जास्त रुपयांची बोली लागते, त्या खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असतो. जर कामगिरी चांगली केली नाही, तर त्या खेळाडूचे मनोबल खचते. यावर्षी अनेक खेळाडूंना चांगला पैसा मिळाला आहे, त्यामुळे फ्रँचायझीला त्यांच्याकडून अपेक्षाी असतात.”
आयपीएलमध्ये समालोचन करण्याबाबत बोलताना रैना म्हणाला की, “मी खूप तयारी केली आहे आणि अनेक दिवस क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मला काय बोलायचं, ते माहितीये. आमचा प्रयत्न हाच राहील की, सर्वांना माहिती देऊ आणि तुमचे मनोरंजनही होईल. मीदेखील आयपीएलची तयारी केली आहे आणि तुमचा वॉर्ड रोब आणखी वाढवण्याची तयारी करत आहे. आयपीएल भारतातील सण आहे, त्यामुळे काहीतरी करायलाच पाहिजे.”
यावेळी खेळपट्टीतून कोणाला अधिक मदत मिळेल, असे विचारले असता, याबाबत रैना म्हणाला की, “मुंबईतील खेळपट्ट्यांमुळे फिरकीपटूंची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि पॉवरप्लेमध्येही ते मोठी भूमिका बजावतील. दुसरीकडे, सीएसके संघाबद्दल रैना म्हणाला की, “या संघाने सूरतमध्ये चांगली तयारी केली आहे आणि त्यामुळे फरक पडेल. जर तुम्ही तीन आठवडे आधीच तयारी केली, तर प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी खेळाडूंचे चांगले संबंध असतील. यावेळी सर्व सामने मजेशीर होणार आहेत.”
रैना म्हणाला की, “मलाही आयपीएलमधून खूप काही शिकायला मिळाले, मी भारतासाठी चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायचो, पण चेन्नईसाठी तिसऱ्या क्रमांकावर यायचो. अवघ्या दोन महिन्यांत तुम्ही आयपीएलमध्ये खूप काही शिकता. त्यात परदेशी खेळाडूही खेळतात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाची पद्धत कळते. अनेक परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खूप काही शिकतात आणि त्यांच्या देशासाठी चांगली कामगिरी करतात. त्यामुळे हे सर्व फायदे आहेत. त्याचबरोबर अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात.”
रैनाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २०५ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने २०० डावांमध्ये ३२.५२च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ३९ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ९ वर्षांच्या नेतृत्वात विराटला जे जमलं नाही, ते डू प्लेसिस करणार का? पाहा कोहली काय म्हणाला
ऑसी क्रिकेटरचा बाउंड्री लाईनवर एकहाती झेल, मागच्या बाजूने धावत घेतलेला अवघड कॅच पाहिलात का?