चेन्नई सुपर किंग्सचा दमदार कर्णधार एमएस धोनी इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नावावर एकापेक्षा एक अशा विक्रमांची नोंद आहे. यशस्वी कर्णधारासोबतच एक फलंदाज म्हणूनही धोनीची आयपीएल आकडेवारी उत्तम आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून तो सर्वोत्तम तर आहेच, त्याचबरोबर तो यष्टीरक्षक म्हणूनही कमालीचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा बाबतीत बोलायचं झालं, तर धोनीचा हात कोणीही पकडत नाही. या यादीत धोनी अव्वलस्थानी विराजमान आहे. या लेखातून आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
आयपीएलमध्ये एमएस धोनीने घेतल्यात सर्वाधिक झेल
आयपीएलच्या मागील १४ हंगामांमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये एमएस धोनी (MS Dhoni) अव्वलस्थानी येतो. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १२६ झेल घेतले आहेत. धोनीने हे सर्व झेल त्याच्या २२० सामन्यांमध्ये घेतले आहेत. धोनीने हे सर्व झेल यष्टीरक्षक खेळाडू म्हणून घेतले आहेत. या यादीत धोनीपाठोपाठ फलंदाज दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) दुसरा नंबर लागतो. कार्तिकही यष्टीरक्षक आहे आणि या स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण १२३ झेल घेतले आहेत. तसं पाहिलं, तर कार्तिक धोनीच्या खूपच जवळ आहे. कदाचित तो धोनीला मागेही टाकू शकतो.
आयपीएलमध्ये एकूण सर्वाधिक झेल पकडण्याबाबत बोलायचं झालं, तर यामध्ये एबी डिविलियर्स (AB De Villiers) ११८ झेलसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे सुरेश रैना (Suresh Raina) याबाबतीत चौथ्या स्थानी आहे. त्याने एकूण १०९ झेल घेतले आहेत. तसेच, ९६ झेलांसह कायरन पोलार्ड (Kieron Pollard) पाचव्या स्थानी आहे.
या स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या ५ खेळाडूंपैकी २ खेळाडू एबी डिविलियर्स आणि सुरेश रैना या स्पर्धेत खेळत नाहीयेत. दुसरीकडे धोनी, कार्तिक आणि पोलार्ड या हंगामातही खेळताना दिसणार आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे ५ खेळाडू
१२६ झेल- एमएस धोनी
१२३ झेल- दिनेश कार्तिक
११८ झेल- एबी डिविलियर्स
१०९ झेल- सुरेश रैना
९६ झेल- कायरन पोलार्ड