भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकाला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय संघाला जोरदार धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.
युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान इशांतच्या पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला होता. त्यामुळे तो आयपीएलमधूनही बाहेर पडला होता. तसेच तो त्याच्या दुखापतीतून सारवण्यासाठी बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये(एनसीए) दाखल झाला होता.
बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार इशांत दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. मात्र तो देखील सध्या एनसीएमध्ये त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. त्यामुळे तो आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
मात्र अजून बीसीसीआयने त्याच्या बदली खेळाडूचे नाव घोषित केलेले नाही.
इशांतची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –
इशांत हा सध्याच्या भारतीय संघातील अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने भारताकडून आत्तापर्यंत ९७ कसोटी सामन्यात २९७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८० वनडे सामन्यात ११५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत.