वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 35 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक कर्णधाक एमएस धोनीला फलंदाजीत विशेष काही करता आलेले नाही. त्याला 1 धावांवर असताना ट्रेंट बोल्टने त्रिफळाचीत करत बाद केले. त्यामुळे धोनी न्यूझीलंड विरुद्ध वनडेत जवळ जवळ 9 वर्षांनंतर एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
याआधी तो शेवटचे न्यूझीलंड विरुद्ध 10 ऑगस्ट 2010 मध्ये डम्बुल्ला येथे झालेल्या वनडे सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला होता. त्यावेळी तो 2 धावांवर बाद झाला होता.
त्यानंतर तो 15 डावात न्यूझीलंड विरुद्ध खेळला पण या 15 ही डावात त्याने दोन आकडी धावसंख्या गाठली होती.
धोनीने आत्तापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध 27 वनडे सामन्यात 49.44 च्या सरासरीने 890 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 अर्धशतकांचाही समावेश आहे.
आज धोनी बाद झाल्यानंतर भारताची आवस्था 4 बाद 18 धावा अशी झाली होती. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.
रायडूने 90 धावा करताना 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शंकर 45 धावांवर बाद झाल्यानंतर केदार जाधव बरोबर सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.
केदारने 34 धावा तर शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.
त्यानंतर भारताने न्यूझीलंडला 44.1 षटकात 217 धावांवर रोखण्यात यश मिळवले. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 आणि भुवनेश्वर कुमारने 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–३६ वर्षानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बाबतीत घडली ही गोष्ट
–रायडू-विजय जोडी चमकली, संघाला संकटातून बाहेर काढताना केला हा मोठा पराक्रम






