आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी तुफान फॉर्मात आहे. क्रीजवर येताच तो चौकार-षटकारांची आतषबाजी करतोय. गोलंदाजांना तर त्याच्यासमोर गोलंदाजी करणंही अवघड जात आहे.
महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2024 मध्ये 255.8 च्या स्ट्राईक रेटनं धावा गोळा करतोय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, धोनीला या आयपीएलमध्ये अद्याप एकही गोलंदाज बाद करू शकलेला नाही. त्यानं या हंगामात पाच डावांमध्ये फलंदाजी केली. या पाचही वेळा तो नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.
माही या हंगामात सर्वप्रथम दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजीला उतरला. दिल्ली विरुद्ध त्यानं 16 चेंडूत ताबडतोब नाबाद 37 धावांची खेळी खेळली. यानंतर तो हैदराबाद आणि कोलकाता विरुद्ध देखील फलंदाजीला आला. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये तो नाबाद 1-1 धावाच करू शकला. यानंतर मुंबई विरुद्ध धोनीनं 4 चेंडूत नाबाद 20 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्यानं हार्दिक पांड्याला सलग तीन षटकार खेचले होते.
यानंतर महेंद्रसिंह धोनी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध फलंदाजीला आला. लखनऊविरुद्ध धोनीनं 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 28 धावा ठोकल्या. यापैकी एक षटकार तर तब्बल 101 मीटर लांबीचा होता. अशाप्रकारे धोनीनं आयपीएल 2024 च्या पाच डावांमध्ये 255.8 च्या स्ट्राईक रेटनं 87 धावा केल्या आहेत. या पाचही डावात तो नाबाद राहिला.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळले, ज्यापैकी त्यांनी 4 सामन्यांत विजय मिळवला असून, 3 सामन्यात पराभव पत्कारला आहे. चेन्नई गुणतालिकेत 8 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईचा आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना 23 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
लखनऊचा चेन्नईवर 8 गडी राखून सहज विजय, राहुल-डी कॉकच्या फटकेबाजीसमोर सीएसकेचे गोलंदाज पूर्णपणे फेल
लखनऊमध्ये जिकडे-तिकडे फक्त धोनीचेच फॅन्स!…दीपक चहरही हैराण, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ