fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एमएस धोनी आयपीएलमध्ये ही खास ‘डबल सेंच्यूरी’ करणारा पहिला भारतीय

बेंगलोर। रविवारी (21 एप्रिल) एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2019 चा 39 वा सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बेंगलोरने 1 धावेने विजय मिळवला.

चेन्नईला पराभव स्विकारावा लागला तरी त्यांचा कर्णधार एमएस धोनीने तुफानी अर्धशतकी खेळी करत खास विक्रम रचला आहे. त्याने या सामन्यात चेन्नईकडून एकाकी झुंज देत 48 चेंडूत नाबाद 84 धावा करताना 5 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली.

या बरोबरच धोनीने आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा धोनी पहिलाच भारतीय तर एकूण तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. धोनीचे आता आयपीएलमध्ये 184 सामन्यात 203 षटकार झाले आहेत.

या आधी आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्सने पार केला आहे. विशेष म्हणजे गेलने आयपीएलमध्ये 300 षटकारांचा टप्पाही पार केला असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 121 सामन्यात 323 षटकार मारले आहेत.

रविवारी झालेल्या या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या. बेंगलोरकडून पार्थिव पटेलने 37 चेंडूत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.

बेंगलोरने विजयासाठी दिलेल्या162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या षटकात 26 धावांची गरज होती. या षटकात धोनीने 3 षटकार आणि 1 चौकार मारत चेन्नईला विजयाच्या समीप पोहचवले होते.

पण शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना चेन्नईच्या दीपक चहरला पार्थिव पटेलने धाव बाद केले. त्यामुळे चेन्नईला 1 धावेने पराभव स्विकारावा लागला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

323 – ख्रिस गेल (121 सामने)

204 – एबी डिविलियर्स (150 सामने)

203 – एमएस धोनी (184 सामने)

190 – रोहित शर्मा (182 सामने)

190 – सुरेश रैना (186 सामने)

186 – विराट कोहली (173 सामने)

 

You might also like