इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ४४ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. गुणतालिकेतील सर्वात वरच्या आणि तळातील संघांमध्ये झालेली ही लढत अतिशय रोमांचक राहिली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने हैदराबादला १३४ धावांवर रोखले. निर्धारित २० षटकांत ७ विकेट्सच्या नुकसानावर हा संघ १३४ धावा फलकावर लावू शकला. यातील तब्बल ३ विकेट्स घेण्यात चेन्नईचा कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी याचा हात राहिला. त्याने यष्टीमागे अप्रतिम कामगिरी करत मोठा विक्रमही केला आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा भाग असलेल्या धोनीने नेहमीच यष्टीमागे त्याची चपळता आणि हुशारी दाखवली आहे. त्यातही आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये त्याने यष्टीमागे १० फलंदाजांना बाद केले आहे. विशेष म्हणजे, त्याने या १० विकेट्स यष्टीमागे झेल पकडून घेतल्या आहेत. या हंगामातील १० पैकी ३ झेल तर त्याने नुकत्याच झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात घेतले आहेत.
सर्वप्रथम जोश हेजलवुडच्या गोलंदाजीवर अवघ्या २ धावांवर जेसन रॉयला त्याने झेलबाद केले. त्यानंतर युवा शिलेदार प्रियम गर्ग हा त्याचा शिकार ठरला. त्याने ड्वेन ब्रावोच्या चेंडूवर ७ धावांमध्ये गर्गला यष्टीमागे झेल पकडून पव्हेलिनयला धाडले. या सामन्यातील त्याची सर्वात लक्षवेधी आणि मोठी विकेट ठरला वृद्धिमान साहा. हैदराबादकडून डावात सर्वाधिक ४४ धावा कुटणाऱ्या साहाला धोनीचे रविंद्र जडेजाच्या चेंडूवर यष्टीमागून झेलबाद केले. या ३ झेलांसह त्याने चेन्नई संघाकडून यष्टीमागे १०० झेल पूर्ण केले आहेत.
https://twitter.com/IPL/status/1443599675060195329?s=20
२००८ पासून चेन्नई संघाचा भाग असलेल्या धोनीने आतापर्यंत या संघाकडून १८५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने यष्टीमागे तब्बल १३३ फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्यातही १०१ बळी त्याने यष्टीमागे झेल टिपत घेतले आहेत, तर ३२ विकेट्स फलंदाजांना यष्टीचीत करत घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
SRH vs CSK, Live: साहाचे अर्धशतक थोडक्यात हुकले, हैदराबादच्या १५ षटकांत ४ बाद ९७ धावा
“आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच राहिले नाही, आता आम्ही अजून खुलून खेळू शकतो”
श्रेयस अय्यरने गोलंदाजाला दिले चॅलेंज, ‘तो अँटिना दिसतोय का? मी तिथे शॉट खेळणार’, पाहा व्हिडिओ






