आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली होती. २००७ टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या एमएस धोनीला मेंटरची भूमिका देण्यात आली होती. अनेकांना असे वाटले होते की, कॅप्टन कूल मेंटरच्या भूमिकेत चमकेल आणि भारतीय संघाला जेतेपद देखील मिळवून देईल. परंतु, भारतीय संघाला या स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. एमएस धोनी मेंटरच्या भूमिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला.
धोनीची पहिली चूक –
एमएस धोनीने रणनिती आखण्यात दरवेळी भारतीय संघाला मदत केली. माध्यमातील वृत्तानुसार, फिटनेसची समस्या असलेल्या हार्दिक पंड्याला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्याची आयडिया एमएस धोनीची होती. तो फिट नव्हता तसेच गोलंदाजी करण्यात देखील अपयशी ठरला होता. तरीदेखील त्याला संघात स्थान दिले गेले होते. गोलंदाजी सोडा फलंदाजीमध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
धोनीची दुसरी चूक –
एमएस धोनी जेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळतो जेव्हा तो आपल्या सुरुवातीच्या ११ खेळाडूंवर विश्वास ठेवत असतो. परंतु टी२० विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ सुरू झाला आणि भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले. सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारला बाहेर करून ईशान आणि शार्दुलला संधी देण्यात आली. असे मोठे निर्णय घेतले गेले म्हणजे साहजिकच एक मेंटर म्हणून धोनीनेही याला सहमती दिली असेल. भारतीय संघाचा हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला आणि न्यूझीलंडकडून पराभवही झाला.
धोनीची तिसरी मोठी चूक –
टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठी चूक म्हणजे रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा ऐवजी ईशान किशनला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले होते. या निर्णयात एमएस धीनीचा ही समावेश होता.
धोनीची चौथी मोठी चूक –
भारतीय संघाच्या पराभवात नाणेफेक खूप महत्वाची ठरली. कारण, पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सुरुवातीच्या ४ फलंदाजांपैकी विराट कोहली पेक्षा इतर कुठल्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करता आली नव्हती. भारतीय संघाने या खेळपट्टीवर सुरवातीच्या १० षटकात संथ गतीने फलंदाजी करायला हवी होती. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजांवर हल्लाबोल करायचा होता. परंतु भारतीय फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादात लवकर बाद झाले होते. ही बाब मेंटोर म्हणून एमएस धोनीच्या लक्षात यायला हवी होती.






