माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठे विजय मिळवले आहेत. तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार असल्याने भारताचा फलंदाज सुरेश रैनाने म्हटले आहे.
रैनाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहे. तसेच धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून रैनाही खेळतो.
नुकत्याच स्टार स्पोर्ट्स तमिळ चॅनेलवर ‘द सुपर किंग्स शो’मध्ये आयपीएल 2020च्या दृष्टीकोनातून बोलताना रैना म्हणाला, ”मला वाटते की आमच्याकडे एक सर्वोत्तम कर्णधार आहे, ज्याने भारतीय संघाचा चेहरा पूर्णपणे बदलला. आता तेच वातावरण आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आहे.’
धोनीने सध्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून त्याने शेवटचा सामना 2019 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल सातत्याने चर्चा होत असतात. पण असे असले तरी तो यावर्षी आयपीएल खेळणार असल्याचे निश्चित आहे.
तसेच यावर्षी एमए चिदंबरम या चेन्नईच्या घरच्या स्टेडियममधील प्रतिबंधित स्टँड खूले करण्यात येणार आहे. त्यामुळे रैनाने म्हटले आहे की ‘आता सर्व जागा उपलब्ध असतील. आशा आहे की आमचे तिथे अधिक चाहते असतील, ज्यामुळे मैदानात अधिक उर्जा असेल.’
तसेच यावर्षीच्या संघाबद्दल रैना म्हणाला, ‘यावर्षी आमच्या संघात बरेच नवीन प्रतिभावान खेळाडू आहेत. पीयूष चावला आहे, त्यानंतर आमच्याकडे जॉस हेजलवुड, सॅम करन आहे. तामिळनाडूचा साई किशोर आहे, तो तमिळनाडूसाठी खरोखरच चांगली गोलंदाजी करीत आहे. मला वाटते की आमच्याकडे तरूण आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.’






