---Advertisement---

किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला

On: शनिवार, सप्टेंबर 23, 2023 6:04 PM
---Advertisement---

वर्ल्डकप जसजसा जवळ येत आहे तसतसे भारतीय प्रेक्षकांची भारतच वर्ल्डकप जिंकणार, ही भावना देखील दृढ होत आहे. बारा वर्षापासून भारतीय संघ वर्ल्डकपच्या प्रतीक्षेत आहे. सलग दोन वेळा सेमी-फायनलमध्ये भारताला अपयश आले. 2015 ला ऑस्ट्रेलियाने तर 2019 ला न्यूझीलंडने टीम इंडियाला जखम दिली. मात्र, 2019 ला मिळालेली जखम अधिक गहरी आणि भळभळती आहे. कारण, त्या सेमी-फायनलमधील पराभवानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हिरो आणि युवा क्रिकेटपटूंचा आदर्श एमएस धोनी अखेरच्या वेळी टीम इंडियाच्या ब्ल्यू जर्सीमध्ये दिसला. धोनीवर सर्व अपेक्षा असताना, मार्टिन गप्टिलने केलेला तो थ्रो थेट स्टंप्सवर आदळला आणि सर्वांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्याचीच ही कहाणी.

पूर्ण लीग स्टेज टॉप करून टीम इंडिया पोहचली सेमी फायनलमध्ये. मँचेस्टरच्या मैदानावर समोर होती न्यूझीलंड. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी हात वर केला आणि न्यूझीलंडच्या डावाची जबाबदारी घेतली. केनने संघर्षपूर्ण फिफ्टी ठोकली. सेमी फायनल आणि फायनलसाठी रिझर्व डे होते. 9 जुलै रोजी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या झालेली 46.1 षटकात 5 बाद 211. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव संपला तेव्हा धावसंख्या होती 239. रॉस टेलरने महत्त्वाच्या 72 धावांचे योगदान दिलेले.

पाऊस पडून गेल्यामुळे वाहणाऱ्या वाऱ्याचा न्यूझीलंडने फायदा उचलला. चौथ्या ओव्हरमध्ये धावफलकावर पाच धावा असताना भारताचे तीन मोहरे गारत झालेले. ते होते रोहित शर्मा, केएल राहुल आणि कॅप्टन विराट कोहली. 24 धावा होईपर्यंत दिनेश कार्तिक देखील बाद झालेला. भारताने चार गडी गमावले तरी एमएस धोनी मैदानात दिसत नसल्याने अनेकांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे केले. अखेर 71 धावा झालेल्या असताना रिषभ बाद झाला आणि धोनी मैदानात उतरला.

सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. हार्दिकसोबत भागीदारी करत असतानाच हार्दिक देखील फार काळ साथ देऊ शकला नाही. त्यानंतर आलेल्या जडेजाला त्याने फ्री लायसन्स देत आक्रमणाची जबाबदारी सोपवली. जडेजाने त्या भूमिकेला न्याय देत तुफानी 77 धावा केल्या.

जडेजा बाद झाला तेव्हा भारतीय संघाला आवश्यकता होती 32 धावांची आणि चेंडू शिल्लक होते 13. या परिस्थितीतून सामना जिंकून देण्याची क्षमता केवळ धोनीमध्ये होती. त्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर धोनीने एक धाव घेत स्ट्राइक आपल्याकडे ठेवली. समीकरण स्पष्ट होते दोन ओव्हर आणि 31 धावा. लॉकी फर्ग्युसन टाकण्यासाठी आलेल्या त्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने पॉईंटच्या डोक्यावरून षटकार ठोकला. धोनी पुन्हा जादू करणार अशी अपेक्षा निर्माण झाली. पुढचा चेंडू डॉट झाला. 10 चेंडू आणि 25 धावा असे समीकरण समोर होतं.

फर्ग्युसन याने पुढचा चेंडू काहीसा बाउन्सर मारला. धोनीने तो चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. तो वेगवान चेंडू त्याच्या हाताला लागून फाईन लेगच्या दिशेने गेला. धोनीने चपळाईने एक धाव पूर्ण केल्यानंतर, स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्यासाठी दुसरी धाव धावण्यास सुरुवात केली. धोनी आरामात पोहोचेल अशी सर्वांना शाश्वती होती. मात्र, घडलं ते भारतीय क्रिकेटसाठी अघटीत होतं.

मार्टिन गप्टिलने वेगाने चेंडूवर येत झपकन चेंडू उचलला आणि थ्रो केला. धोनी अवघा एक इंचाने क्रिजमध्ये येण्यापासून कमी पडला आणि गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर आदळला. पंच रिचर्ड केटलब्रो यांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि धोनी आउट असल्याचा निर्णय स्क्रीनवर झळकला.

एकीकडे न्यूझीलंड आपली दुसरी वर्ल्डकप फायनल फिक्स झाल्याचा आनंद साजरा करत होते, तर धो़नी मान खाली घालून ड्रेसिंग रूमकडे परतत होता. सर्व चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तर, अख्खा वर्ल्डकप गाजवलेला रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये रडत होता. राहिलेले दोन विकेट घेत न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत सलग दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली. भारतीय संघाचे विश्वचषक विजयाचे स्वप्न चार वर्षे पुढे ढकलले गेले.

भारतीय क्रिकेटप्रेमींच्या काळजावर धोनीच्या त्या रनआऊटने मीठ चोळण्याचे काम केले 15 ऑगस्ट 2020 रोजी. त्यादिवशी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्धचा तो सेमीफायनलचा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटचा सामना ठरलेला. ‘धोनी आहे ना तो जिंकून देईल’ हा विश्वास मात्र त्याने कमावलेला. तो अखेरपर्यंत तसाच राहिला.

(MS Dhoni Last Run Out In 2019 ODI World Cup)

विश्वचषक विशेष-
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---