आयपीएल, या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये खेळाडूला प्रकाशझोतात येण्यासाठी एखादी खेळी किंवा विकेटही पुरेशी असते. गुजरात टायटन्सविरुद्ध रविवारी (१५ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२२मधील ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून मथीशा पथिराणा याला पदार्पणाची संधी मिळाली होती. या संधीचे नाणे खणखणीत वाजवत मथीशाने अविस्मरणीय असे प्रदर्शन केले. त्याच्या प्रदर्शनाचे खुद्द एमएस धोनी यानेही कौतुक केले आहे.
मथीशाने (Matheesha Pathirana) गुजरातविरुद्ध पदार्पण (IPL Debut) करताना आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या मथीशाने पहिल्याच चेंडूवर गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलला (Shubman Gill) पायचित (Matheesha Pathirana Maiden IPL Wicket) केले. तसेच त्याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही अवघ्या ७ धावांवर बाद केले. अशाप्रकारे त्याने पदार्पणाच्या सामन्यात ३.१ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत २ विकेट्स चटकावल्या.
भलेही चेन्नईने हा सामना गमावला. मात्र धोनीने मथीशाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तो एक चांगला खेळाडू असून त्याची गोलंदाजी शैली हुबेहुब लसिथ मलिंगासारखी असल्याचे धोनीने म्हटले.
धोनी मथीशाचे कौतुक करताना काय म्हणाला?
ज्यूनियर मलिंगा म्हणून ओळखला जाणाऱ्या मथीशाची स्तुती करताना धोनी म्हणाला, “तो एक शानदार डेथ गोलंदाज आहे. तो अगदी मलिंगासारखाच आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे फलंदाजांतडून चुका होण्याची शक्यताही जास्त आहे. कारण स्लिंग ऍक्शनमुळे त्याच्या चेंडूला कमी उसळी मिळते. जर त्याचा चेंडू एक गज जरी दूर पडला, तर चेंडू जास्त उसळी घेणार नाही आणि तो बॅटवरही लागणार नाही. त्या चेंडूला फ्लिक करणे अवघड होईल.”
पुढे बोलताना धोनी म्हणाला की, “मथीशा चांगली स्लोअर गोलंदाजीही करतो. त्याच्या या चेंडूला खूप सावधानीने खेळावे लागते. त्याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त सेकंद खर्च करावे लागतील. तो वेगवान गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याच्याविरुद्ध फटका मारणे सोपे नसते.”
महत्त्वाच्या बातम्या-
ये हुई ना बात! ‘मराठमोळ्या’ ऋतुराजने सचिनच्या होम ग्राउंडवरच मोडला त्याचा ‘स्पेशल’ विक्रम
अभिराम निलाखे, ईशान दिगंबर, सिद्धी खोत, श्रावणी देशमुख यांचा मुख्य फेरीत प्रवेश






