चेन्नई। मंगळवारी(7 मे) आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) क्वालिफायर 1 चा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर अंतिम सामन्यातही थेट प्रवेश केला.
या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईच्या पराभवामागील कारण स्पष्ट केले आहे. हे कारण स्पष्ट करताना त्याने फलंदाजांना जबाबदार धरले आहे. या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात केवळ 131 धावा करता आल्या होत्या.
धोनी सामन्यानंतर म्हणाला, ‘घरच्या मैदानावर खेळताना खेळपट्टी लवकर समजायला पाहिजे होती. आम्ही येथे 6 ते 7 सामने आधी खेळलो आहे. हाच घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होता. आम्हाला खेळपट्टी कशी असेल हे जाणून घेण्याची आवश्यकता होती. चेंडू बॅटवर नीट येत आहे की नाही, अशा काही गोष्टी आम्ही नीट केल्या नाही. मला वाटते फलंदाजीमध्ये सुधारणा व्हायला हवी.’
त्याचबरोबर धोनी पुढे म्हणाला, ‘हे सर्वोत्तम फलंदाज आहेत. आम्ही चांगली फलंदाजी करत आहोत असे वाटले होते, परंतू काही चूकीचे फटके मारले गेले. हे असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. ते अनुभवी आहेत. त्यांना परिस्थितीचा आंदाज यायला हवा होता. आशा आहे की आम्ही पुढील सामन्यात चांगला खेळ करु.’
चेन्नईने दिलेल्या 132 धावांचे आव्हान मुंबईने 18.3 षटकात सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. चेन्नईकडून इम्रान ताहिरने सर्वाधिक 2, तर दिपक चहर आणि हरभजन सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच या सामन्यात चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांकडूनही अनेक चूका झाल्या.
त्यामुळे गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल आणि क्षेत्ररक्षणातील चूकांबद्दल धोनी म्हणाला, ‘मला वाटते आम्ही थोडे कमनशीबी ठरलो. काही झेल घेण्यात अपयश आले. आम्हाला कदाचीत फलंदाजांपासून थोडी दूर गोलंदाजी करायला हवी होती. आमच्याकडे खूप धावा धावफलकावर नव्हत्या. जेव्हा 130 धावांचा बचाव करत असता तेव्हा प्रत्येक बाउंड्री महत्त्वाची ठरते.’
याबरोबरच चेन्नई सुपर किंग्सला मागील 6 पैकी 4 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र तरीही सुरुवातीच्या चांगल्या कामगिरीमुळे चेन्नईला गुणतालिकेत पहिल्या दोन जागांमध्ये स्थान मिळवण्यात यश आले.
याबद्दल धोनी म्हणाला, ‘अशावेळी सामने पराभूत होणे चांगले नाही. परंतू तरीही आम्ही पहिल्या अव्वल दोन जागांमध्ये स्थान मिळवणे चांगले आहे. सुदैवाने पहिल्या दोन स्थांनामध्ये असल्याने आम्हाला दुसरी संधी मिळाली आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, हा वेगवान गोलंदाज संघातून बाहेर…
–आयपीएल आता आयआयटीच्या परिक्षेत! धोनीने काय निर्णय घ्यावा, असा विद्यार्थ्यांना प्रश्न…
–दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, २०१९ विश्वचषकाला मुकणार हा वेगवान गोलंदाज






