शारजाह| आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा चौथा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभूत केले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करतांना सात बाद 216 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ केवळ 200 धावा करू शकला.
या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला, “217 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती जी या सामन्यात होऊ शकली नाही.”
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनने 32 चेंडूत 74 धावा केल्या आणि कर्णधार स्मिथनेही 69 धावा फटकावल्या. सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांचेही कौतुक करतांना धोनी म्हणाला, “दोघांनीही चांगली फलंदाजी केली. याखेरीज आम्हाला त्यांच्या गोलंदाजांनाही श्रेय द्यावे लागेल. जेव्हा आपण पहिला डाव खेळतो तेव्हा आपल्याला कुठे गोलंदाजी करावी लागेल याची जाणीव होते.”
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू राहुल तेवटीयाने तीन गडी बाद केले. फिरकीपटूंचे कौतुक करतांना धोनी म्हणाला, “त्यांचे फिरकीपटू फलंदाजांपासून दूर गोलंदाजी करत होते. आमच्या फिरकी गोलंदाजांनी पूर्ण लांबीची गोलंदाजी करून चूक केली. जर राजस्थान रॉयल्सला आम्ही 200 धावांवर रोखले असते तर हा एक चांगला सामना झाला असता.”
फलंदाजीच्या क्रमवारीत धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला का येत नाही असे विचारले असता तो म्हणाला, “मी बऱ्याच दिवसांपासून फलंदाजी केलेली नाही. 14 दिवसांच्या क्वारंटाईनमुळे काम अधिक कठीण झाले. तसेच मला नवीन गोष्टी आजमावून पाहायच्या होत्या. सॅम करनला संधी द्यायची होती. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी आहे. जर ती गोष्ट यशस्वी झाली नाही तर आपण आपल्या सामर्थ्यावर परत जाऊ शकतो.”
या सामन्यात चेन्नईकडून अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिसने शानदार कामगिरी केली होती. त्याने 1 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 37 चेंडूत 72 धावा केल्या. त्याचे कौतुक करतांना धोनी म्हणाला, “फलंदाज कदाचित त्यांच्याकडून शिकतील. स्क्वेअर लेग वर खेळणे टाळतील आणि लाँग-ऑन आणि लाँग-ऑफच्या दिशेने अधिक खेळतील.”