भारतीय क्रिकेट संघात सध्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी असे चांगले नेतृत्व गुण असलेले खेळाडू आहेत. विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी भारताचा नियमित कर्णधार आहे. तर बऱ्याचदा त्याच्या अनुपस्थितीत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा प्रभारी कर्णधार म्हणून दिसतो. तसेच धोनीच्या अनुभवाची संघाला मोठ्या प्रमाणात मदत होते.
या तिघांच्याही नेतृत्वातील फरक भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सांगितला आहे. कार्तिक हा विराट, रोहित आणि धोनी या तिघांच्याही नेतृत्वाखाली खेळला आहे. त्यामुळे त्याला या तिघांच्याही नेतृत्वाच्या शैली माहित आहेत.
याबद्दल कार्तिक म्हणाला, ‘एमएस हा खूप स्वाभाविक कर्णधार आहे. तो मैदानातील परिस्थिती पाहून निर्णय घेतो. दुसरीकडे विराट हा आक्रमक आहे. तो प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या आंदाजात उत्तर देणे पसंत करतो. विराटमध्ये आत्मविश्वास आहे. तो खेळाडू आणि कर्णधार म्हणून नियमितपणे त्याचा स्तर उंचावत आहे.’
‘रोहित हा आधी आभ्यास करतो. तो रणनीती तयार करतो. तसेच संघातील फलंदाजांशी आणि गोलंदाजांशी सातत्याने संवाद साधतो. तो कर्णधार म्हणून त्याच्या रणनीतीवर लक्ष केंद्रीत करतो. तसेच ती बदलण्यासाठीही नेहमी तयार असतो.’
कार्तिकने भारताकडून कधी यष्टीरक्षक म्हणून, कधी मधल्या फळीतील फलंदाज तर कधी फिनिशर अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे विविध क्रमांकावर खेळण्याचा अनुभव आहे. त्याचमुळे कार्तिक हा मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रबळ दावेदार आहे.
कार्तिकला 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमला होणार आहे. तर दुसरा सामना 27 फेब्रुवारीला बंगळूरु येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–पृथ्वी शॉच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी बातमी
–२००० सालापुर्वी पदार्पण केलेले हे ५ खेळाडू विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्ती
–२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी