ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदक विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 ऑगस्ट) दिल्लीत भेट घेतली आणि त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी भारतीय हेवीवेट बॉक्सर नरेंद्र बेरवाल याने पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याशी झालेला एक खास संवाद शेअर केला, जे ऐकून सर्वांना हसू आवरता आले नाही.
बेरवालने राष्ट्रकुल स्पर्धेच्या 90+ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. त्याने मोदींच्या भेटीवेळी 2015 च्या वर्ल्ड मिलिटरी गेम्समधील एका पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याला पराभूत केल्याचा आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीतील एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “त्यावेळी माझा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता आणि मला आपल्या सैन्याकडून फोन आला की तू पाकिस्तानविरुद्ध हरू शकत नाही. तो सामना मी जिंकला, मात्र जखमी झाल्याने उपचारासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो.”
“तेव्हा बऱ्याच वेळानंतर तो पाकिस्तानी बॉक्सर म्हणाला, तुझे नाव नरेंद्र आहे, तुझ्या कोचचे नावही नरेंद्र आहे आणि तुमच्या पंतप्रधानांचे नावही नरेंद्र आहे. त्यामुळे मला आता नरेंद्र नावाचा तिरस्कार वाटतोयं,” असे बेरवालने मोदींना सांगितले.
नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान बनले. तसेच सैन्यातून आलेल्या नरेंद्र बेरवालच्या प्रशिक्षकाचेही नाव नरेंद्र राणा होते. त्यामुळे नरेंद्र या नावाचा एक अनोखा योगायोग जुळून आला. जेव्हा बेरवालने हा किस्सा मोदींना सांगितला तेव्हा त्यांना आणि तेथे उपस्थित असलेल्या खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंग संघाने धमाकेदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने एकूण 39 पदके जिंकली. त्यामुळे भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी होता. त्यातील 10 पदके तर बॉक्सर्सनी जिंकली. तसेच भारताच्या जिंकलेल्या 13 पैकी 7 सुवर्णपदकांमध्येही बॉक्सर्सचाच भाग आहे. ही भारतीय बॉक्सर्सची आतापर्यंतची या खेळांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
ही स्पर्धा 11 दिवस रंगली. स्पर्धेच्या समारोपादिवशी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि ऑलिम्पिक अध्यक्षा पीटी उषा यांना पुढील स्पर्धेसाठी अधिकृत ध्वज दिला गेला. आता या स्पर्धेचा पुढील हंगाम 2030 मध्ये खेळला जाणार असून, त्याचे यजमानपद भारताला मिळाले आहे. ही स्पर्धा अहमदाबादमध्ये रंगणार आहे. (mujhe narendra naam se nafrat Narender Berwal narrating his conversation with a Pakistani boxer to PM Modi video)






